सिनेमा म्हणजे मनोरंजन. सिनेमामध्ये काम करणा-या कलाकारांची नेहमीच मजा असते, असं आपल्याला वाटत असतं. परंतु भूमिकेसाठी अनेक कलाकरांना खूप वेळा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आजवर त्यांनी जे काही केलं नाही ते देखील त्यांना भूमिकेसाठी करावं लागतं.
प्रवीण राजा दिग्दर्शित तुझीच रे सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी आनंदाला फक्त मडकी बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली ऐवढेच नाही तर भाषा शिकायला देखील मेहनत घ्यावी लागली. आनंदा त्याबद्दल सांगतो की तुझीच रे या सिनेमात मी फिलीप नावाच्या मडकी बनवणा-या कुंभाराची भूमिका साकारतोय. कुंभाराची भूमिका साकारण्यासाठी मला वसई गावात जाउन कुंभाराकडे मडकी बनवण्याची कला शिकावी लागली.
आपल्याला वाटते तेवढी ही कला सोपी नाही. तो मातीचा गोळा वाटतो तेवढा मऊ नसतो. आपल्या हातावर नियंत्रण खूप महत्त्वाचे असते. ती कला शिकण्यासाठी माझा एक आठवडा गेला. याचबरोबर सिनेमात माझी भाषा ईस्ट इंडियन मराठी भाषा आहे. म्हणजेच मुंबईतील स्थायिक लोकांची ही खरी भाषा आहे. जी कोकणी भाषेशी मिळती जुळती आहे. दिग्दर्शक प्रवीण राजा सांगतात की, सिनेमातील हा सीन शूट करणे खूप कठीण गेले. एकतर शहरी भागात सध्या कुंभार सापडत नाही आणि सध्या मडकी बनवण्याचे मोठे चाक कुठेही सापडत नाही.आम्ही या चाकासाठी संपूर्ण मुंबई पालथी घातली. अखेर आम्हाला धारावीत ते चाक सापडले. अखेर ते चाक एका सीनसाठी वसईला आणले. आणि आमचे शूटींग पार पडले. या सीनसाठी कला दिग्दर्शक केशव ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.