Join us

आणि भाग्यश्री मिलिंद झाली ‘आनंदी’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 8:00 PM

‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट १५ फेब्रुवारीला शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंदने बाजी मारली आहे.

पहिला चित्रपट सुपरहिट झाला की कलाकाराला ओळख मिळते, मात्र त्याच वेळी त्याच्या पुढे आव्हान निर्माण होते दुसरा चित्रपट निवडण्याचे. अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद त्याबाबतीत ‘आनंदी’ ठरली, कारण ‘बालक पालक’ ने बालकलाकार म्हणून ओळख दिलेल्या भाग्यश्रीच्या वाट्याला कारकीर्दीच्या सुरुवातीलाच एक ऐतिहासिक, आव्हानात्मक भूमिका आली आहे, ती म्हणजे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची. भाग्यश्री सांगते, आनंदीबाईंची व्यक्तीरेखा पडद्यावर साकारणे हे एक आव्हान होते, आनंदीबाईंचा वय वर्ष १२ ते २१ पर्यंतचा प्रवास समजून घेणे, आनंदीबाईंची बोलण्याची शैली, तत्कालीन स्त्रियांचे जीवनमान, त्या काळातील देहबोली अशा गोष्टी आत्मसात करायच्या होत्या. आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्याशी असणारे संबंध त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांतून उलगडतात, यामुळे आनंदीबाईंच्या अधिकाअधिक जवळ जाता आले.

झी स्टुडीओज, फ्रेश लाईम फिल्मस्, नमः पिक्चर्स यांची निर्मिती असलेला ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट १५ फेब्रुवारीला शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंदने बाजी मारली आहे. खंबीर, दृढनिश्चयी, प्रेमळ, आज्ञाधारक आणि ध्येयवेडी अशा आनंदीबाईंच्या छटा भाग्यश्रीने उत्तमरित्या साकारत संधीचे सोनं केले आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

सुमारे १३० वर्षापूर्वीचा काळ. १८७५ ते १८८७चा काळ, ज्यावेळी रुढी आणि परंपरा यांचा प्रचंड पगडा होता. प्रस्थापित आणि प्रवाहाविरोधात जाऊन एखादी गोष्ट करायची म्हटली की तथाकथित समाजाकडून विरोध हा होणारच. तसा तो त्या काळातही व्हायचा. स्त्री शिक्षणाबाबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी व्रत हाती घेतलं त्यावेळी त्यांनाही अशाच विरोधाचा सामना करावा लागला.पारंपरिक विचारसरणी आणि पुरोगामी विचारांचा संघर्ष त्याकाळी झाला.

असाच काहीसा संघर्ष गोपाळ विनायक जोशी आणि आनंदी गोपाळ जोशी यांच्या वाट्यालाही आला. समाजाचा विरोध पत्करुन गोपाळ जोशी यांच्या पत्नी आनंदीबाई स्वतःच्या हिंमतीवर इंग्रजी शिक्षण घेतात, अमेरिकेत जातात आणि भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनतात हे आपण वाचलं आहे. मात्र या दोघांच्या कथेवर आधारित आनंदी गोपाळ हा चित्रपट बनवण्याचं शिवधनुष्य  पेललं ते दिग्दर्शक समीर विध्वंस आणि पटकथालेखक इरावती कर्णिक यांनी. या चित्रपटाच्या निमित्ताने हा जीवनसंघर्ष तब्बल १३२ वर्षांनंतर मराठी रसिकप्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवायची संधी मिळाली आहे.

टॅग्स :आनंदी गोपाळललित प्रभाकर