Join us  

...अन् स्वप्न पूर्ण झाले - गिरीधरण स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2017 2:53 PM

सतीश डोंगरेदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करीत असलो तरी मला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीचे आकर्षण राहिले आहे. त्यातही मुंबईतच आयुष्यातील बराचसा ...

सतीश डोंगरेदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करीत असलो तरी मला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीचे आकर्षण राहिले आहे. त्यातही मुंबईतच आयुष्यातील बराचसा काळ व्यतित केल्याने मी महाराष्ट्राचाच आहे. वास्तविक मराठी चित्रपटासाठी काम करणे हे माझे पूर्वीपासूनचे स्वप्न राहिले असून, ते वास्तवात येत असताना दिसत आहे. मात्र ही माझी सुरुवात आहे. कारण मला मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणखी योगदान द्यायचे असून, त्यादृष्टीने मी भविष्यात काम करणार आहे, अशी भावना अभिनेत्री प्रियंका चोपडानिर्मित ‘काय रे रास्कला’ या तिच्या दुसºया मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीधरण स्वामी यांनी व्यक्त केली. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : ‘काय रे रास्कला’ या नावातच दाक्षिणात्य तडाखा लावल्याचे दिसत आहे. यामागे काही खास कारण आहे का?- नावावरून हा चित्रपट कॉमेडी असेल हे उघड होते, हेच त्यामागचे खास कारण आहे. चित्रपटातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन व्हावे याच उद्देशाने त्याची निर्मिती केली आहे. प्रियंका चोपडा निर्मित हा दुसरा मराठी चित्रपट असून, सहकुटुंब चित्रपटाचा आनंद घेता येणे शक्य होणार आहे. या चित्रपटाचे केवळ तीन दिवसांचे शूटिंग शिल्लक असून, हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी आनंददायी होता. प्रियंकाच्या पहिल्या मराठी ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटातून वडील आणि मुलाच्या नात्यातील दुरावा दाखविला होता. विनोदी, पण तितकेच अंतर्मुख करणाºया ‘व्हेंटिलेटर’ला प्रेक्षकांनी पसंत केले होते. असेच प्रेम ‘काय रे रास्कला’ या चित्रपटालाही मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रश्न : पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून काम करीत आहात, काय अनुभव सांगाल?- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव जरी पाठीशी असला तरी, दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच तेही मराठी चित्रपटासाठी काम करीत आहे. खरं तर मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणे हे माझे स्वप्न होते. भविष्यातदेखील मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल. खरं तर मराठी इंडस्ट्रीसोबत माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. आयुष्यातील बराचसा काळ मुंबईमध्ये व्यतित केल्याने महाराष्ट्र आणि येथील सिनेमा माझ्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. बेंगळुरू, चेन्नई आणि मुंबई हे माझे घर असून, येथे मिळालेली प्रत्येक संधी माझ्यासाठी अनमोल आहे. त्यामुळे या ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा अनुभव अविस्मरणीय होता, असेच म्हणता येईल. प्रश्न : प्रियंका चोपडाने तुम्हाला दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली, याविषयी काय सांगाल?- बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही स्वत:चा लौकिक निर्माण करणाºया अभिनेत्री प्रियंका चोपडा हिचे मराठी चित्रपटसृष्टीविषयीचे प्रेम कधीच लपून राहिले नाही. ‘व्हेंटिलेटर’सारख्या दर्जेदार चित्रपटाच्या निर्मितीनंतर तिने ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रियंकाने दिग्दर्शक म्हणून जेव्हा माझी निवड केली, तेव्हा माझ्यासाठी ही एक प्रकारची सुवर्ण संधीच होती. वास्तविक दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच समोर येणार होतो. अशात माझ्याबाबतीत प्रियंकाने केलेले धाडस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता तिने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणे हेच माझे प्रथम ध्येय असून, त्यादृष्टीने माझे काम सुरू आहे. प्रश्न : मराठी चित्रपटांचा चेहरा बदलत आहे, यावर दाक्षिणात्य सिनेमांचा प्रभाव आहे, असे तुम्हाला वाटते का?- माझ्या मते, चित्रपटात भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रभाव असायला हवा. सध्या बºयाचशा दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदीबरोबरच मराठीतही रिमेक बनविले जात आहेत. आता तर मराठी चित्रपटांची दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये रिमेक बनविले जात आहेत. ‘सैराट’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे या चित्रपटांवर एकमेकांचा प्रभाव असतोच. यात काही वावगे नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन आणि सामाजिक संदेश या दोन गोष्टी साध्य होणे हेच प्रत्येक निर्मात्यांचा अंतिम उद्देश असतो. प्रश्न : भविष्यात कोणत्या मराठी कलाकाराबरोबर चित्रपट करायला आवडेल?- असे सांगणे अवघड आहे. खरं तर माझ्यासाठी सर्वच कलाकार गुणी आहेत. आता सयाजी शिंदे यांचे नाव घेतल्यानंतर त्यांचा मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीवरील प्रभाव लगेचच समोर येतो. कारण भाषा हा मुद्दा नाही तर टॅलेंट याचा विचार सर्वत्र होतो. सध्याच्या मराठी कलाकारांबद्दल मला हीच बाब प्रकर्षाने जाणवत आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक कलाकार असल्याने त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. प्रश्न : तुमच्या आणखी प्रोजेक्टविषयी काय सांगाल?- सध्या तरी मी, ‘काय रे रास्कला’ या चित्रपटावरच लक्ष केंद्रित करून आहे. मात्र आगामी काळात मराठी इंडस्ट्रीमध्ये आणखी काही प्रोजेक्टवर काम करण्याचा मानस आहे. कारण या इंडस्ट्रीने मला भरपूर काही दिले आहे. या इंडस्ट्रीप्रती मला नेहमीच आकर्षण राहिले असल्याने मी मराठीमध्ये आणखी काही प्रोजेक्टवर काम करू इच्छितो.