९०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे (Priya Berde). प्रिया बेर्डेंनी मराठी आणि हिंदीत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या त्या नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये सक्रिय आहेत. नुकतेच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअर, खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. दरम्यान प्रिया बेर्डे यांनी मुलाखतीत स्वामींचा साक्षात्कार झाल्याचे सांगितले.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात स्वामींची त्यांना आलेल्या प्रचीतीबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, मधल्या काळात म्हणजे १३-१४ वर्षांपूर्वी माझ्याकडे काहीच काम नव्हते. तेव्हा मी काय करु असा प्रश्न पडला होता. काहीच मार्ग दिसत नव्हता. सगळी कामं बंद झाली होती. मुलांच्या फी भरायच्या होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, दादरच्या स्वामी समर्थांचा मठातला फोटो माझ्या डोळ्यासमोर आला. त्यावेळी मी रडत होते. दहाव्या मिनिटाला सोलापूरवरुन कॉल आला की, अक्कलकोटला एक कार्यक्रम आहे, तुम्हाला यायचं आहे. तुम्हाला एवढं मानधन मिळेल.
हा चमत्कार घडला. तिथेच मी दंडवत घातला आणि यापुढे अक्कलकोटला दरवर्षी मी येणार. तेव्हापासून स्वामींचे धरलेले पाय मी कधीच सोडणार नाही. स्वामींचं नाव माझ्या नेहमी तोंडात असतं. वाईट गोष्टीतून त्यांनी मला बाहेर काढलं. माझी त्यांच्यावर फार श्रद्धा आहे.