देवाला भेटण्यासाठी देवाच्या मुळ अस्तिव असलेल्या जागीच जावं लागतं असं म्हणतात. महाराजांच्या रायगडाला भेट म्हणजे जणू देवाला जवळून भेटण्याची संधीच. ही संधी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ –नाटयशाखा रंगमंच सहयोगाने नाटयरसिकांना १८ एप्रिलला मिळणार आहे ती रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या निमित्ताने....
वसंत कानेटकर लिखित, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे मराठीमध्ये हजारो प्रयोग झाले आहेत. मराठी नाट्यसृष्टीतील अतिशय दिग्गज कलाकारांनी या नाटकाला न्याय दिला आहे. आता नव्या संचात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रायगडावर १८ एप्रिलला ’वारसा’ दिनाच्या निमित्ताने रंगणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८ एप्रिल २०२२ रोजी सायं. ६.१५ वा.विशेष कार्यक्रम रायगड किल्ल्यावर आयोजित केला आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा प्रयोग विनामूल्य सादर केला जाणार आहे. या नव्या संचात प्रमोद पवार, यश कदम, उपेंद्र दाते, मोहन साटम, सुभाष भागवत, मा.चिन्मय, मयूर भाटकर, संध्या वेलणकर व अनिता दाते हे कलाकार असून याचे दिग्दर्शन उपेंद्र दाते यांनी केले आहे. नव्या शुभारंभानंतर नाटकाचे महाराष्ट्राभर गोवा, इंदोर असे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.