Join us  

Ankush Chaudhari : 'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 2:38 PM

अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे. 

मराठी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी.  आजवर त्याने 'दुनियादारी', 'दगडी चाळ', 'महाराष्ट्र शाहीर', 'गुरु', 'क्लासमेट्स' अशा असंख्य लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनतीच्या जोरावर अंकुशने कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या अभिनेत्याच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे. 

अंकुशचं एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तोडी मिल फँटसी' असं या नाटकाचं नाव आहे. मूळच्या मुंबईकरांचं अस्तित्व शहरातून कसं हद्दपार होतंय, हे भाष्य करणार हे नाटकं आहे. अंकुशने फेसबुकरवर शहरीकरण झालेल्या मुंबईचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिले की, 'नमस्कार, मी अंकुश चौधरी. गेली पन्नास वर्ष मी या मुंबई शहरात राहतोय. या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारं हे शहर मी रोज पाहतोय. याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, कॉटर, दोस्ती, यारी, थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी'.

त्याने पुढे म्हटले की, 'सांगायची गोष्ट ही की हे शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताच पाणी करून हे शहर उभ केलं, त्या कामगारांचं अस्तित्वच हे शहर नाकारू लागलंय. या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच'. 

 'एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार 'तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. २२ जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह. सायंकाळी ४:०० वा. राणीबाग भायखळा येथे. या आपल्या शहराची, आपल्या गिरणगावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझी खात्री आहे माझ्या या प्रयत्नात तुम्ही मला नक्की साथ द्याल. तुमचा मित्र आणि गिरणगावचा भूमिपुत्र- अंकुश चौधरी', अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.  

टॅग्स :अंकुश चौधरीसेलिब्रिटीमराठी अभिनेतामुंबईफेसबुक