Join us  

'रात्रीस खेळ चाले'मधील अण्णा उर्फ माधव अभ्यंकर दिसणार 'लाईफलाईन' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 5:56 PM

Madhav Abhyankar : आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता 'लाईफलाईन'मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chaale) मालिकेतील अण्णाच्या भूमिकेतून अभिनेते माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) घराघरात पोहचले. त्यांनी आतापर्यंत मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ते 'लाईफलाईन' (Lifeline Movie) या सिनेमात झळकणार आहेत. आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या विचारांवर, मतांवर ठाम असणाऱ्या एका खंबीर किरवंताची ते या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता 'लाईफलाईन'मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. याबद्दल माधव अभ्यंकर म्हणाले की, ''देव आयुष्य देतो, तर किरवंत मोक्ष देतो, अशा धार्मिक विचारसरणीची ही व्यक्तिरेखा असून त्याचा भक्ती, श्रद्धा यांवर जास्त विश्वास आहे. प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काही कारण असते, हे पटवून देणारी ही भूमिका आहे. यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या परंतु अशा प्रकारची भूमिका मी पहिल्यांदाच साकारत आहे. त्यातही अशोक सराफ यांसारखे मातब्बर कलाकार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तरुण दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. हल्लीच्या तरुणाईचा दृष्टिकोन, त्यांची कामाची पद्धत हेसुद्धा शिकण्यासारखे आहे.'' 

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, 'लाईफलाईन' या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्या मुख्य भूमिका आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शिन केले असून राजेश शिरवईकर यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत तर अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. 

टॅग्स :अशोक सराफ