स्वातंत्र्याबद्दलच्या अभिनेत्री कंगना राणौतच्या वक्तव्याचं समर्थन करून वाद ओढवून घेणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी आज पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेतही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. कंगना या मुलीला मी ओळखत नाही. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वत:ची काही कारणं असू शकतात. तसाच मी तिच्या वक्तव्याला पाठींबा दिला, यामागेही माझी स्वत:ची काही कारण असू शकतात. ती समजून न घेताच धुरळा उडाला, असं ते पत्रपरिषदेत म्हणाले. त्यांच्या या पत्रपरिषदेच्या पार्श्वभूमीवर अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) याने विक्रम गोखलेंची बाजू घेत, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार टोला हाणला आहे. क्रांती रेडकर-समीर वानखेडे प्रकरणाचा संदर्भ देत आरोहने विक्रम गोखलेंवर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.
‘क्रांती रेडकरच्या वेळेस गप्प बसलेले सो-कॉल्ड कलाकार सगळे विक्रम गोखलेंवर टिका करायला आले. त्या वेळेस घाबरले होते बहुतेक,’ असं खोचक ट्विट आरोहने केलं आहे. क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडेवर अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केले होते. अजूनही आरोपांची ही मालिका सुरूच आहे. यावेळी क्रांती रेडकरला पाठिंबा देण्यासाठी कोणताही मराठी कलाकार पुढे आला नव्हता. तेच कलाकार विक्रम गोखलेंवर टीका करत आहेत, याकडे आरोहने लक्ष वेधलं आहे.
आरोहने दिला होता क्रांतीला पाठींबासमीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप झाल्यानंतर क्रांती मैदानात उतरली होती. त्यावेळी आरोह वेलणकरने तिला पाठिंबा दिला होता. ‘क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे,’ असं ट्विट त्याने त्यावेळी केलं होतं.