Join us  

फिल्मसिटीचा पुनर्विकास अन् चित्रपटांसाठी धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 8:46 AM

अविनाश ढाकणेदादासाहेब फाळके यांनी मुंबईतून १९१३ मध्ये चित्रपटसृष्टीची सुरुवात केली. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबई हे चित्रपटसृष्टीचे आकर्षण आहे. ...

अविनाश ढाकणे

दादासाहेब फाळके यांनी मुंबईतून १९१३ मध्ये चित्रपटसृष्टीची सुरुवात केली. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबई हे चित्रपटसृष्टीचे आकर्षण आहे. देशात तयार होणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी ५० टक्के चित्रपटनिर्मिती महाराष्ट्रात होते. मुंबईत गोरेगाव फिल्मसिटी येथे १६ स्टुडिओ आणि सेट उभारण्यासाठी ७० खुली ठिकाणे आहेत. मुंबईबाहेरही काही स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण केले जाते. काही देश चित्रपटसृष्टीला आकर्षित करण्यासाठी काही योजना आखतात किंवा सुविधा देतात. तेथील स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास आर्थिक सवलती दिल्या जातात. सध्या पोलंड, स्पेन, न्यूझीलंड आर्थिक सवलती देतात. चित्रपटसृष्टी मुंबईत वाढली; पण आता स्पर्धाही वाढली आहे. दक्षिणेत मल्याळी, कन्नड, तेलगू, तामीळच्या चारही चित्रपटसृष्टींच्या स्वतःच्या व्यवस्था आहेत. शूटिंगही तिथेच होतात. फक्त उत्कृष्ट तंत्रज्ञानासाठी ते मुंबईत येतात. चित्रपट निर्मात्यांच्या सुविधांचा विचार करून लवकरच चित्रपट धोरण आणले जाईल. ते महाराष्ट्रात उपलब्ध आहे, त्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज लागणार नाही, अशी व्यवस्था सरकार करणार आहे. राज्य, देश तसेच जगभरातून लोकांनी यावे, यासाठी पोषक वातावरण तयार केले जाणार आहे. मराठी चित्रपटांना उत्तेजन देण्यावर भर दिला जाईल.फिल्मसिटीचा पुनर्विकास वॉर्नर ब्रदर्सच्या स्टुडिओप्रमाणे केला जाईल. अल्टा मॉडर्न स्टुडिओ असेल. पूर्वी त्याची निविदा काढली होती, पण पुढे काम झाले नाही. आता नव्याने त्याचा अभ्यास सुरू आहे. नवीन प्रस्तावात काही स्टुडिओ टुरिझम झोन असतील. तेथे लाइव्ह शूटिंग पाहता येईल. फूड कोर्ट असतील. व्हॅनिटी व्हॅनची गरज भासणार नाही. स्टुडिओ आणि रूम अद्ययावत असतील. प्रॉडक्शन आणि स्टुडिओत मॉडर्न टेक्नाॅलॉजी असतील. कार्यालये, हॉटेल तयार केले जातील. राज्यात चित्रपटसृष्टीला उत्तेजन मिळावे यासाठी विविध पावले उचलली जातात. शूटिंग करताना अडचणी कमी व्हाव्या, परवानग्या एका जागी मिळाव्या, यासाठी २०१९ ला सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी ती मर्यादित होती. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये शूटिंगला वाव आहे, अशा जिल्ह्यांमध्ये ती सुरू झाली आणि आता तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यात ती लागू होईल. पूर्वी १५ दिवसांत परवानगी मिळायची, ती आता सात दिवसांत मिळते.

मराठीला प्रोत्साहन

मराठीत चांगले चित्रपट येत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळावे म्हणून अ आणि ब श्रेणीनुसार ३० आणि ४० लाखांचे अनुदान दिले जाते. याबाबत एक समिती आहे, ती चित्रपटाचा अभ्यास करून श्रेणी ठरवते. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या चित्रपटाला अनुदान दिले जाते. आर्थिक सवलती मिळतात. मराठी सोडून इतरांना अशा सवलती दिल्या जात नाहीत.

अविनाश ढाकणे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ

टॅग्स :मराठी चित्रपट