ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातील ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’ ही गाणी ऐकली की डोळे अलगद मिटून जातात. आणि, आपण कधी स्वप्नांमध्ये रमून जातो हे आपलं आपल्यालाच कळत नाही. आशा भोसले यांनी त्यांच्या गोड आवाजात मराठी, हिंदी अशा अनेक भांषांमध्ये गाणी गाऊन कानसेनांना तृप्त केलं आहे. विशेष म्हणजे आजही वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांच्यातील सळसळता उत्साह कायम असून नुकतंच त्यांनी एका मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.
महेश टिळेकर दिग्दर्शित 'हवाहवाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गाणं गायलं असून त्यांचा आवाज श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी बऱ्याच वर्षानंतर मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आहे.
पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या "जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची...' असे शब्द असलेलं गाणं आशा भोसले यांच्या सुमधूर आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, 'हवाहवाई' या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका अंतर्गत करण्यात आली असून विजय शिंदे यांनी निर्मितीपदाची धुरा सांभाळली आहे.