गेली अनेक दशकं मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे (asha kale) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तं त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. येत्या २६ जून रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
आशा काळे हे नाव मराठी सिनेसृष्टीत कायम आदराने घेतलं जातं. आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा, नाटकांमध्ये काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
या पुरस्कार सोहळ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, अभिनेता समीर चौगुले यांची मुलाखत, मनिषा लताड प्रस्तूत हिटस् ऑफ लता मंगेशकर व आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपारिक भारूड या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, 'बाळा गाऊ कशी अंगाई', 'अर्धांगी', 'बंधन', 'कुलस्वामिनी अंबाबाई', 'कैवारी', 'तांबडी माती', 'थोरली जाऊ', 'चांदणे शिंपीत 'जा, 'गनिमी कावा', 'देवता', 'बंदिवान मी या संसारी', 'ज्योतिबाचा नवस', 'चोराच्या मनात चांदणे', 'माहेरची माणसे' अशा कितीतरी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.