अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात लिलाबाई काळभोर या भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांना पाहायला मिळाले होते.
नयनतारा यांनी अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटात काम केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले शांतेचे कार्ट चालू आहे हे नाटक तुम्हाला आठवत असेलच ना... या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईच्या भूमिकेत आपल्याला नयनतारा यांना पाहायला मिळाले होते. या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना ऑन स्क्रीन वरील लक्ष्मीकांत यांची आई असे देखील म्हटले जात असे. आई पाहिजे, आधार, खुळ्यांचा बाजार, तू सुखकर्ता, धांगडधिंगा, बाळा गाऊ कशी अंगाई यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
नयनतारा यांचे 2014 मध्ये निधन झाले. त्यांना निधनाच्या अनेक वर्षं आधीपासून डायबेटीस होता. या आजारामुळे त्या चांगल्याच त्रस्त झाल्या होत्या. याच आजारामुळे त्यांच्या निधनाच्या आठ वर्ष आधी त्यांचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता. अखेरची काही वर्षं त्या सतत आजारी असल्याने 10 वर्षं तरी त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यांनी माऊली प्रॉडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका साकारल्या होत्या. अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.