बॉलिवूडमध्ये आपण बऱ्याचदा अभिनेत्रींमधील कॅटफाइट किंवा कलाकारांमधील शीत युद्ध पाहत असतो. मात्र, याला मराठी सिनेसृष्टी अपवाद असल्याचं म्हटलं जातं. कारण, मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मैत्रीखातर मित्रांच्या पडत्या काळात त्यांना साथ दिली. मदतीचा हात दिला. सध्या मराठी कलाविश्वातील नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या मैत्रीचा किस्सा चर्चिला जात आहे. एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर यांच्या पडत्या काळात अशोक मामांनी त्यांना साथ दिली होती. एका मुलाखतीमध्ये नानांनी याविषयी भाष्य केलं होतं.
सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकरांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अशोक सराफ खऱ्या अर्थाने कशी मैत्री जपतात हे सांगितलं आहे. 'हमीदाबाईची कोठी नाटक करत असताना मला ५० रुपये आणि अशोकला २५० रुपये मिळायचे. त्या पडत्या काळात अशोकने मला पैशांची खूप मदत केली. नाटकाच्या मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी मला पैसे मिळावे म्हणून तो मुद्दामून हरायचा. हे माझ्याही लक्षात यायचं पण तेव्हा मला पैशांची गरज होती. अगदी नाटकानंतर बऱ्याचदा मी अशोकचं डोकं चेपून द्यायचो, पाय चेपायचो आणि त्याचेही तो मला पैसे द्यायचा,' असं नाना म्हणाले.
पुढे ते म्हणतात, 'एकदा गणपतीला माझ्याकडे पैसे नव्हते. फुलांचा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. सकाळी सहा साडे सहा वाजता अशोक फिल्मसिटीमध्ये शूटिंगला निघाले होते. माहीमच्या घरी आले, दारावर टकटक केलं, माझ्या हातात एक कोरा चेक दिला आणि म्हणाला.. खात्यात १५ हजार आहेत…तुला हवे तेवढे काढ. असं म्हणून ते निघून गेले. मी तीन हजार रुपये काढले होते. काही वर्षानंतर आम्ही एका सिनेमात एकत्र काम करत होतो. त्यावेळी मी ते परत दिले.'
'ते जनरल वॉर्डमध्ये होते आणि...'; वडिलांच्या उपचारासाठी नाना पाटेकरांकडे नव्हते पैसे
दरम्यान, नाना आजही अशोक सराफ दिसले की त्यांचे पाय चेपून द्यायला पुढे सरसावतात. मात्र, आता अशोक सराफ त्यांना रोखतात आणि त्यांची मस्करी करतात. मात्र, त्यांच्यातील ही मैत्री आजही अबाधित आहे. 'हमीदाबाईची कोठी' या नाटकामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली. आणि, आजही नाना पाटेकर अशोक सराफ यांनी केलेली मदत विसरले नाहीत.