मराठीतील सर्वात एव्हरग्रीन जोडी म्हणजे अशोक मामा (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf). 80 च्या दशकात सुरु झालेली ही लव्हस्टोरी आजही तितकीच ताजी वाटते. या दोघांकडे पाहिलं की 'अशी ही बनवाबनवी','धुमधडाका' हे चित्रपट डोळ्यासमोर येतात. तर या जोडीने मामला पोरीचा या सिनेमात एकत्र काम केलं होतं. आणि तुम्हाला माहितीए का याच चित्रपटाच्या सेटवर दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती. स्वत: अशोक मामांनी तो किस्सा सांगितला आहे.
1987 साली 'मामला पोरीचा' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या सेटवर नक्की काय घडलं हे खुद्द अशोक सराफ यांनीच शेअर केलंय. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये अशोक मामा आणि निवेदिता गप्पा मारत आहेत. यामध्ये अशोक सराफ म्हणतात, 'मला अजून आठवतंय, मामला पोरीचा सिनेमाच्या शूटवेळी तुझं लवकर पॅकअप झालं. त्यानंतर तू माझ्याकडे आलीस. त्यावेळी तू अशोकजी म्हणायचीस मला. तू म्हणालीस, बाय. तू जातीये म्हणल्यावर मी जरा उदास झालो होतो. तू दरवाज्याकडे जायला निघालीस. दोन दरवाज्यांमध्ये एक चौकोनी पार्टिशन होतं. त्यात मध्ये मध्ये फट होती. तेव्हा मी म्हटलं आता ही त्या दरवाज्याच्या फटीतून माझ्याकडे बघणार. अशी मला खात्रीच होती. आणि तू बघितलंस. ए तेरी की! तिथंच समजलं की प्रेमाची नैय्या पार झाली.
विशेष म्हणजे यश चोप्रांचा मुलगा आणि सध्याचा आघाडीचा निर्माता दिग्दर्शक आदित्य चोप्रा या सिनेमात असिस्टंट होता. अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्हस्टोरी त्याने पाहिली होती. यावरुनच त्याला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटात 'पलट...' या सीनची कल्पना सुचली.
या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'आमची ऑल टाईम फेव्हरेट जोडी' असं अनेकांनी लिहिलं आहे. अशोक मामांचे चित्रपट आणि त्यांचे किस्से ऐकतंच राहावं असं वाटतं. आजची पिढीही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांची चाहती आहे. 'अशी ही बनवाबनवी' सिनेमा तर वर्षानुवर्षे चालणारा आहे.