अशोक सराफ आणि समीर पाटील यांच्या भन्नाट टायमिंगने महाराष्ट्र होणार शेंटिमेंटल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2017 9:50 AM
"तुम्ही दिलेले ७० रुपये वारले", "आमच्या पॅलेसच्या आवारात सात गेस्ट हाऊस आहेत... व्हॅह्या व्हीही उख्खु...", "नारळाची झाडं, आंब्याची झाडं, ...
"तुम्ही दिलेले ७० रुपये वारले", "आमच्या पॅलेसच्या आवारात सात गेस्ट हाऊस आहेत... व्हॅह्या व्हीही उख्खु...", "नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फेणीची झाडं, झाडांची झाडं" हे आणि असे अनेक डायलॉग आपल्या अभिनयाच्या विशिष्ट स्टाईलने आणि विनोदाच्या अप्रतिम टायमिंगने अजरामर केलेल्या अशोक सराफ यांचा "करप्ट अधिकारी आणि अट्टल गुन्हेगार मी एका नजरेत ओळखतो", हा शेंटिमेंटल या चित्रपटातील डायलॉग सध्या व्हायरल झाला आहे. समीर पाटील दिग्दर्शित शेंटिमेंटल या चित्रपटात अशोक सराफ यांनी पांडू हवालदारनंतर पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका साकारली आहे. पोश्टर बॉईज, पोश्टर गर्ल या चित्रपटांमुळे खुसखुशीत संवाद, उत्कृष्ट संहिता आणि अचूक दिग्दर्शन यांचा मिलाफ साधत सामाजिक विषयांना विनोदाची झालर देत मनोरंजक चित्रपट बनवणारा दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे.शेंटिमेंटल या त्यांच्या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना पोलीस ही असली तरी हा फक्त पोलिसांवरील चित्रपट नाही. युनिफॉर्मकडे मग तो पोलिसांचा असो, पोस्टमनचा असो, जवानाचा असो कायमच आदराने बघितले जाते. परंतु त्या युनिफॉर्म आतमध्ये दडलेल्या माणसाकडे बघण्याची फुरसत आपल्याला नसते. शेंटिमेंटलच्या निमित्ताने युनिफॉर्मच्या आत दडलेल्या माणसाचा वेध घेण्याचा प्रयत्न समीर पाटील यांनी केला आहे. या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नेहमी करारी भूमिकेत दिसणारा उपेंद्र लिमये कूल डूड पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके यांच्या ई.सी.एम. पिक्चर्स निर्मित, आर.आर.पी कॉर्पोरेशन, बनी डालमिया प्रस्तुत शेंटिमेंटल या चित्रपटात अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांच्यासोबत विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुबीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोती, राजन भिसे, विद्याधर जोशी यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. Also Read : अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला शेंटिमेंटल होणार लवकरच प्रदर्शित