मराठी सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा आज जन्मदिवस. वयाच्या ७५ व्या वर्षीही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकतंच त्यांनी रितेश जिनिलियाच्या 'वेड' सिनेमात काम केलं. छोट्या भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांना हसवलंच. अशोक मामांबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप कमी जणांना माहित असतील.
बालपणीचे मित्र अशोक सराफ आणि सुनील गावस्कर
अशोक सराफ मुंबईतल्या चाळीत वाढले. गिरगावामधील चिखलवाडी त्यांचं बालपण गेलं. तर त्यांच्या बालपणीच्या मित्रांमध्ये भारतीय क्रिकेट संघातील लिटिल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचाही समावेश होता. दोघंही बालपणापासूनच खूप चांगले मित्र आहेत. अशोक मामांनी एकदा त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला होता.
अशोक सराफ म्हणाले, "सुनील आणि माझी वेगवेगळी इमारत होती. आमच्या दोन्ही इमारतींमध्ये दर रविवारी क्रिकेटचा सामना चालायचा. आम्ही खेळायचो म्हणजे नुसतंच नावाला. सुनील त्यावेळी जेमतेम आठ-दहा वर्षांचा असेल. पण प्रत्यक्षात खरं खेळायचा तो सुनीलच. त्याने बॉल मारला की आम्ही बॉलमागे पळायचो. तेव्हापासूनच तो जबरदस्त खेळायचो. त्याला आऊट करणं आमच्यासाठी अशक्यच असायचं.'
नाटकातही केलं काम
ते पुढे म्हणाले, "सुनीलने माझ्यासोबत एका नाटकातही काम केलं होतं. 'गुरुदक्षिणा' असं त्या नाटकाचं नाव होतं. त्याने श्रीकृष्णाची आणि मी बलरामाची भूमिका साकारली होती. नाटकातला तो फोटो मी अजूनही जपून ठेवला आहे. सुनील उत्तम नट आहे. त्यानं 'सावली प्रेमाची' या मराठी सिनेमात आणि 'मालामाल' या हिंदी सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.