अशोक सराफ यांचा आज म्हणजेच ४ जूनला वाढदिवस असून त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.
अशोक सराफ हे प्रसिद्ध अभिनेते बनल्यानंतर देखील काही वर्षं बँकेत नोकरी करायचे असे त्यांनीच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, माझ्या बँकेतील लोकांनी मला सांभाळून घेतल्यामुळेच मी नोकरी आणि अभिनय या दोन्ही गोष्टी करू शकलो. मला नाटकाच्या प्रयोगाला, चित्रीकरणाला जायचे असल्यास मला ते लवकर जाऊ द्यायचे. एवढेच नव्हे तर माझ्या वाट्याचे काम देखील माझे सहकारी करायचे. १९७८ सालापर्यंत तर मी माझ्या कामात इतका व्यग्र झालो होतो की, मी संपूर्ण वर्षांत एकदा देखील बँकेत गेलो नाही. त्यावेळी घडलेला एक किस्सा तर खूपच मजेशीर आहे.
मी आजरी असल्याने ऑफिसला येऊ शकत नाही असे मी कळवले होते आणि त्यासाठी मी मेडिकल सर्टिफिकेट देखील दिले होते. पण मी अनेक महिने बँकेत जातच नसल्याने एकदा बँकेकडून माझ्या घरी डॉक्टरांना पाठवण्यात आले. माझ्या घरी बँकेतून कोणी येणार याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती. ही मंडळी माझ्या घरी आली तेव्हा माझ्या बहिणीने दरवाजा उघडला. मी कुठे आहे असे तिला विचारले असता मी कोल्हापूरला चित्रीकरण करायला गेलो असल्याचे तिने त्या मंडळींना सांगितले. आता माझी काही खैर नाही हे मला कळले होते. पण त्यावेळी देखील माझ्या बँकेतील मंडळींनी मला साथ दिली. माझ्या वरिष्ठांनी माझा हा रिपोर्ट कित्येक महिने दाबून ठेवला होता.
अभिनयक्षेत्रात मी स्थिरावलो त्यात माझ्या या मंडळींचा नक्कीच हात आहे. मी जवळजवळ दहा वर्षं बँकेत नोकरी केली. या दरम्यान मी चित्रपटांमध्ये काम करत असलो तरी या क्षेत्रात आपले बस्तान बसेल का याची मला काळजी वाटत होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या विचार करून मी नोकरी सोडत नव्हतो. मला जोपर्यंत बँकेकडून हकलून देण्यात येणार नाही, तोपर्यंत मी नोकरी करणार असे मी पक्के ठरवले होते. पण चित्रीकरणामुळे नंतरच्या काळात कोल्हापूरमध्येच माझा जास्त वेळ जायचा. बँकेत जाणे माझ्यासाठी शक्यच होत नव्हते. माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये असे मला वाटले असल्याने मी नोकरीचा राजीनामा दिला.