अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही मराठी चित्रपट सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. अनेक चित्रपटात एकत्र काम करून या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९९० साली त्या दोघांनी गोव्यातील मंगेशी मंदिरात लग्नगाठ बांधली. अशोक सराफ हे निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे निवेदिता यांच्यासोबत त्यांची फार जुनी ओळख होती. चित्रपटात एकत्र काम करत असताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते हे बहुतेकांना माहित आहे. मात्र अशोक सराफ यांनीच निवेदीताच्या प्रेमात पडल्याचा एक किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे.
अशोक सराफ आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत फार कमी बोलताना दिसतात. मात्र पहिल्यांदाच त्यांनी निवेदीतच्या प्रेमात पडल्याचा एक किस्सा सांगितलेला आहे. १९८८ साली मामला पोरींचा या चित्रपटात या दोघांनी एकत्रित काम केले होते. त्यावेळी घडलेल्या किस्याबाबत ते म्हणाले की, ‘मामला पोरींचा या चित्रपटात एकत्रित काम करत असताना निवेदिताचं पॅकअप झालं त्यानंतर ती माझ्याजवळ आली आणि मला बाय म्हणाली. त्यावेळी मला वाईट वाटलं पण मी ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. ती जात असताना माझ्या डोक्यात आलं की समोर असलेल्या दाराजवळ गेल्यावर ती आपल्याकडे वळून बघणार आणि तसंच झालं. तेव्हाच मला खात्री पटली की आमच्यामध्ये काहीतरी नक्की आहे.’ नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र काम केलं. याचवेळी त्यांच्यातील मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.