Join us

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमाची घोषणा, या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 1:25 PM

अशोक सराफ आणि 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा अर्थात माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमातून महत्वाचा विषय मांडण्यात येणार आहे (lifeline, ashok saraf)

अशोक सराफ यांचे सिनेमे पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. अशोकमामांचे सिनेमे चाहत्यांना खळखळून हसवतात. याशिवाय अशोकमामांच्या काही सिनेमांमधून प्रेक्षकांना सामाजिक संदेश मिळतो. अशोक सराफ यांच्या आगामी सिनेमातून आधुनिक विज्ञान आणि जुने रितीरिवाज यांच्यातील संघर्ष बघायला मिळणार आहे. या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून अशोक सराफ या सिनेमात डॉक्टरांच्या भूमिकेत दिसत आहेत. सिनेमाविषयी आणखी जाणून घ्या.

विज्ञान-परंपरा यांच्यातील संघर्ष

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महानायक अशोक सराफ आणि 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर दिसत आहेत.

अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील वैचारीक मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. 

लाईफ लाईन सिनेमातले कलाकार आणि रिलीज डेट

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफ लाईन' या सिनेमात हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या सिनेमाचे निर्माते लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट आहेत. 'लाईफ लाईन' हा सिनेमा ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी आहे. २ ऑगस्टपासून हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :अशोक सराफरात्रीस खेळ चालेरात्रीस खेळ चाले ३मराठीमराठी चित्रपट