मराठीतील सुपरस्टार आणि कॉमेडीचा बादशहा ज्यांनी अभिनय आणि विनोदीशैलीने ८०-९०चा काळ गाजवला ते म्हणजे अशोक सराफ. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज ७७व्या वर्षीही ते चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण, इतका मोठा कलावंत असूनही त्यांनी साधेपणा सोडलेला नाही. मराठीतील सुपरस्टार असूनही प्रेक्षकांचे लाडके अशोकमामा कधीही सूट-बूट किंवा ब्लेझरमध्ये दिसत नाहीत. अनेक कार्यक्रम, इव्हेंटलाही ते साध्या कपड्यांत दिसतात. यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.
सूट-बूट किंवा ब्लेझर का घालत नाहीत, यामागचं कारण अशोक सराफ यांनी न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
...म्हणून ब्लेझर घालत नाहीत अशोक सराफ!
"मला ते आवडतच नाही. मी सूट बूट घालून आलो किंवा ब्लेझरमध्ये इथे बसलो तरच हे वाढेल, असं मला अजिबात वाटत नाही. तुम्ही कसे दिसता, यापेक्षा तुम्ही काय करता याला जास्त महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यातही आणि लोकांच्या दृष्टीनेसुद्धा...तुम्ही कपडे काय घातलेत किंवा कसे दिसता हे फक्त तेवढ्या क्षणापुरतं असतं. त्यानंतर सगळं विसरलं जातं. त्यानंतर तुम्ही पुढे काय करता, हे महत्त्वाचं आहे".
सूट-बूटपेक्षा कामाला महत्त्व!
"पडदा उघडल्यानंतर काय सेट आहे ते लोक आधी बघतात. पण, त्यानंतर जेव्हा कलाकाराची स्टेजवर एन्ट्री होते तेव्हा फक्त तो काय करतोय, याकडेच प्रेक्षकांचं लक्ष असतं. मग तो सेट लोक विसरून जातात. तिकडून लोकांचं लक्ष तुमच्याकडे यायला हवं. हे बाकी सगळं सजावट वगैरे ठीक आहे. पण, ती फक्त २ मिनिटांसाठी असते. एक जाणकार प्रेक्षक तुम्हाला तुम्ही चांगले कपडे घातलेत असं कधीच म्हणणार नाही. तो तुमच्या कामाचं कौतुक करतो. आणि शेवटी हेच महत्त्वाचं असतं".