Join us  

'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वलबाबत अशोक सराफ यांचा खुलासा, म्हणाले - "लक्ष्मीकांत बेर्डेने.."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 3:11 PM

Ashi Hi Banva Banvi : 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांचं तितकचं मनोरंजन करतो.

'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banva Banvi Movie) हा चित्रपट मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांचं तितकचं मनोरंजन करतो. लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), अशोक सराफ (Ashok Saraf), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), प्रिया बेर्डे (Priya Berde), सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar), निवेदिता सराफ (Nivedita Saraf), अश्विनी भावे (Ashwini Bhave ), सुधीर जोशी (Sudhir Joshi), सिद्धार्थ रे (Siddharth Ray), विजू खोटे (Viju Khote) अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. या सिनेमाला आजही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. या चित्रपटातील डायलॉगबरोबरच गाणीही प्रचंड हिट ठरली होती. या चित्रपटाचा सीक्वल येणार का, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशी ही बनवा बनवी चित्रपटाच्या सीक्वलबाबत नुकतेच अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी एका मुलाखतीत खुलासा केला.

अशोक सराफ यांचा नुकताच लाईफलाईन हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी डॉक्टराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अशी ही बनवा बनवी चित्रपटाच्या सीक्वलवर भाष्य केले. त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ३५ वर्षे झाली तरीदेखील लोक अशी ही बनवा बनवी चित्रपट पाहत आहेत. अजूनही बघतात सगळे. या चित्रपटाने वेगळाच इतिहास घडविला आहे. अतिशय वेगळा सिनेमा होता. सतत चित्रपट पाहिला जातो. याचे कारण म्हणजे चित्रपटाचा कंटेट. त्याचा लेखक वसंत सबनीस होते. असा लेखक होणे नाही. मराठी चित्रपटासाठी त्याने जी कॉमेडी लिहिली आहे, चौघाची धडपड जी लिहिली, प्रश्नच नाही. दिग्दर्शक सचिन पिळगावकरने ते व्यवस्थित रेखाटले आहे. 

''चित्रपटाचा सीक्वल तितकाच...''

ते पुढे म्हणाले की, लक्ष्मीकांत बेर्डेने जे काही केले ते औरच आहे. मला असे वाटते की त्याच्या आयुष्यातील सगळ्यात चांगली भूमिका ती आहे. सचिन तर इतका सुंदर कधी दिसलाच नाही. कधीकधी जमून जात असे. म्हणून त्याचा रिमेक करणे थोडे कठीण आहे. चित्रपटाचा सीक्वल तितकाच चांगला व्हायला हवा किंवा त्यापेक्षा जास्त चांगला असायला हवा. त्यामुळे थोडे अवघडच आहे.   

टॅग्स :अशोक सराफलक्ष्मीकांत बेर्डेसचिन पिळगांवकरनिवेदिता सराफ