पिरॅमिड फिल्मस हाऊस प्रस्तुत हृदयात समथिंग समथिंग हा धमाल विनोदी सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 5 ऑक्टोबरला अवघ्या महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. नऊ वर्षांच्या मुलांपासून ते अगदी नव्वदीच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांना पाहता येईल, असा हा कौटुंबिक सिनेमा आहे.
सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन सांगतात, “आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच काही ना काही टेन्शन्स असतात. म्हणूनच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्याच्या उद्देश्याने आम्ही हा सिनेमा बनवला. विनोदी सिनेमा म्हटला की, कॉमेडीचे बादशाह अशोक सराफ तर हवेतच. अशोकमामांच्या खास विनोदी शैलीतला हा सिनेमा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हा आवडेल, असा मला विश्वास आहे.” ते पुढे सांगतात, “आजकाल विनोदी सिनेमा म्हटला की, कमरेखालचे विनोद जास्त असतात. त्यामुळे संपूर्ण कुटूंबाला एकत्र येऊन असे सिनेमे पाहता येत नाहीत. पुलंच्या महाराष्ट्राला असे विनोद रूचणारही नाहीत, हे ध्यानात ठेवून आम्ही कौटुंबिक मनोरंजनावर भर दिला आहे.”
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सांगतात, “माझ्या विनोदी सिनेमांवर महाराष्ट्रातल्या माय-बाप प्रेक्षकांनी गेली 49 वर्षं भरभरून प्रेम दिले आणि आता या सिनेमालाही रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, अशा मला अपेक्षा आहे. सर्वांना खळखळून हसवणारा हा सिनेमा आहे.”
सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण राजा कारळे सांगतात, “आपण सर्वच अशोकमामांचे सिनेमे पाहत लहानाचे मोठे झालो. आज अमराठी सिनेरसिकांनाही अशोक सराफ यांचे अनेक सिनेमे आणि त्याचे संवाद पाठ आहेत. हा सिनेमाही त्याच पठडीतला आहे. त्यामुळे तुम्ही नि:संकोच आपल्या कुटुंबाला घेऊन हा सिनेमा पाहू शकता.”
रोमँटिक कॉमेडी सिनेमा म्हटला की, त्यात संगीत खूप महत्वाचा घटक असतो. या सिनेमातली ‘हृदयात समथिंग समथिंग’, ‘तुझी ओढ लागली’ आणि ‘चंद्रमुखी’ ही तीनही गाणी सर्वच रेडिओ स्टेशन्स आणि म्युझिक चॅनलवर सध्या गाजत आहेत.
पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.