मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. स्वप्नीलने नुकताच चाहत्यांशी संवाद साधला. #AskSJ सेशल घेत त्याने चाहत्यांच्या एक ना अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत. एका प्रश्नाला उत्तर देताना स्वप्नीलने त्याच्या मनातील एक सलही बोलून दाखवली. मराठी मनोरंजन सृष्टीत असा कुठला कलाकार (Actor or Actress) आहे ज्याच्यासोबत काम करायचं आहे पण अजून योग आला नाही ? असा प्रश्न अंकिता नावाच्या एका चाहतीने स्वप्नीलला विचारला. यावर, स्वप्नीलने एक खंत व्यक्त केली.
मला स्मिता पाटील यांच्या बरोबर एक फ्रेम तरी शेअर करायला मिळायला हवी होती ! ती सल कायम राहिल माझ्या मनात! आणि दुर्दैवाने हा योग आता कधीच येणार नाही, असं तो यावर उत्तर देताना म्हणाला.
अभिनेता झाला नसतास तर काय असला असता? असा प्रश्न एका चाहत्याने केला. यावर वकील, असं उत्तर स्वप्नीलने दिलं. इतकं यशस्वी करिअर केल्यावर, आयुष्यात अजून काय करणं बाकी आहे?असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. यावर खूप काही.... सगळ्यात महत्त्वाचं समाजाची परतफेड, सामाजिक उपक्रमातून, असं उत्तर स्वप्नीलने दिलं.
तू पठाण पाहिलास का? असंही एका चाहत्याने विचारलं. यावर अजून तरी नाही, असं उत्तर त्याने दिलं. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत काम करण्यात काय फरक आहे? असं एकाने विचारलं. यावर काहीही फरक नाही. दोन्हींकडे सारखीच मेहनत लागते. पण माझ्या मते, तुलनेने मराठीतला कन्टेन्ट अधिक चांगला आहे.