Join us

'बायल्या आणि.. या नावांनी हिणवायचे, तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला पण...'; प्रसिद्ध कोरियोग्राफरचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 12:34 PM

पुरुष मंडळींनी लावणी सादर केली, अनेक जण त्यांच्याकडे पाहून नाक मुराडतात. त्यांना टोमणे मारतात..टीका करतात. असाच एक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे ज्याला या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागले होते.

पुरुष मंडळींनी लावणी सादर केली, अनेक जण त्यांच्याकडे पाहून नाक मुराडतात. त्यांना टोमणे मारतात..टीका करतात. असाच एक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे आशिष पाटील(Ashish Patil), ज्याला या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणं आशिषनेच कोरिओग्राफ केले आहे. यागोदरही त्याने त्याच्या नृत्याच्या आविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आशीिषचा या यशाचा प्रवास मात्र त्याच्यासाठी मुळीच सोपा नव्हता. 

नृत्याला घरातूनच होणारा विरोध, त्यामुळे अनेकदा आशिष पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. बालपण अतिशय वाईट गेलेल्या आशिषचा प्रवास नेमका कसा होता हे नुकतेच त्याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीतून उलगडले आहे. आशिष हा पाटील कुटुंबातला लाडका एकुलता एक मुलगा होता. आशिषला दोन मोठ्या बहिणी विजया आणि आरती. त्याच्या आईची अशी इच्छा होती की कुणीतरी कलाक्षेत्रात यावं पण वडिलांचा कला क्षेत्रालाच विरोध होता. शिक्षण, नोकरी आणि मग लग्न करून घरसंसार संभाळावं अशी त्यांची सर्वसाधारण विचारसरणी होती. पण आपल्या मुलाची आवड काय आहे हे त्याच्या आईने ओळखले होते.

आशिष जेव्हा लहान होता तेव्हा गाणी वाजली की तो आपोआप थिरकायला लागायचा . तेव्हा त्याच्या आईनेच त्याला नृत्य शिकवले होते. दूरदर्शनवरील चित्रहार पाहत असताना माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तो नृत्य करत असे. ही सगळी मुलींची गाणी असल्याने तो त्याचप्रमाणे नृत्य करू लागला. त्यावेळी आशिष मुलींच्या स्टेप्स करू लागला त्यामुळे लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हा मुलींसारखा नाचतोय म्हणून त्याला कोणीच मित्रही नव्हते. एवढंच नाही तर नातेवाईकांमध्येही त्याला मित्र म्हणून कोणी जवळ करत नव्हते. या एकाकीपणामुळेच आशिष आपल्या नृत्यावर लक्ष केंद्रित करू लागला. 

एक दिवस असा आला की वडिलांनीच त्याला नृत्य करायचं असेल तर घराबाहेर निघ असा समज दिला. पण आशिषचे नृत्यावर प्रेम होते आणि म्हणूनच तो घुंगरू घेऊन घराबाहेर पडला. त्यावेळी तो सातवी इयत्तेत शिकत होता. पण तीन दिवसानंतर वडिलांचे प्रेम जागे झाले आणि त्याला ते पुन्हा घरात घेऊन आले. अर्थात समाजाने नाव ठेऊ नये याच उद्देशाने त्यांनी आशिषला घर सोडण्यास सांगितले होते. आशिष उत्तम नृत्य करायचा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याने जवळपास १८० बक्षिसं मिळवली होती मात्र वडिलांच्या विरोधामुळे त्याने ती बक्षिसं कधीच घरी आणली नाहीत. ही बक्षिसं तो मित्राच्या घरी ठेवायचा. आईच्या प्रोत्साहनामुळे आशिष नृत्यात निपुण होत गेला. अनेकदा तो रात्री आईच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडायचा. जवळ पैसे नसल्याने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आशिष विना तिकीट रेल्वेने प्रवास करायचा. एक दिवस तर विनातिकीट प्रवास केल्याचे पाहून टीसीने त्याला दिवसभर त्याच्या टेबलजवळ उभे केले होते. पण त्याकाळी फोन नसल्याने आणि जवळ एक रुपयाही नसल्याने त्याला सोडण्यात आले होते. पण लोक ‘तू हे नाही करू शकत’ हे असं जेव्हा बोलायचे तेव्हा आशिष तेवढ्याच जिद्दीने पुढे पाऊल टाकत राहायचा. याच लोकांमुळे मी हे यश गाठू शकलो असे आशिष म्हणतो.

आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे तुमचे मन मोकळे करायला कोणीच तुमच्या जवळ नसते. त्यावेळी आशिषला आयुष्य संपवून टाकावेसे वाटू लागलं. तेव्हा तो टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात जाऊन बसला. विचारांनी त्याच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहत होते तेव्हा त्याच्याजवळ एक गुरुजी आले. या गुरुजींनी आशिषला एक मोलाचा सल्ला दिला.’ बाळा तुला एकच सांगतो, प्रत्येकाचा जन्म हा काहीतरी कारणासाठी झालाय, तू ते कारण शोध, ते कारण कळले ना तर तुला कोणीही थांबवू शकणार नाही. प्रत्येकाला अर्धनारीचं वरदान नाहीये तुझ्याकडे ते आहे, अर्धनारी हे नृत्याचं दैवत आहे. यानंतर आशिषने आत्महत्येचा निर्णय बदलला. पण दुसऱ्या दिवशी तो त्या गुरुजींचे धन्यवाद मानायला पुन्हा मंदिरात गेला तेव्हा त्याला कुठेच ते गुरुजी दिसले नाही. बाप्पाच त्या रुपात येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन गेले असे त्यावेळी त्याला जाणवले. 

आशिषने बीएस्सी आयटीचे शिक्षण घेतले होते त्यामुळे वडिलांची इच्छा होती की त्याने आयटी क्षेत्रात नोकरी करावी पण आशिष लहाणपणापासूनच नाटकातून काम करत होता त्यामुळे दहा लोकांपेक्षा आपण काहीतरी वेगळे करावे जेणेकरून पाच लोक आपल्याला नावाने ओळखतील असे म्हणून त्याने वडिलांना विरोध केला होता. आशिषला घुंगरांचा आवाज खूप आवडायचा त्याने नृत्याचे प्रशिक्षण कोणाकडूनही घेतले नव्हते. कॉलेजमध्ये असतानाही अनेक जण त्याला साडी नेसून लावणी करतो म्हणून हिनवायचे. मी कॉलेजमध्ये गेल्या गेल्या बायल्या, छक्का अशा कित्येक नावाने मला हाक मारल्यात. माझ्यासाठी फळ्यावर नको ते शब्द लिहिलेले असायचे. मला कॉलेजमध्ये जाणं फार कठीण जायचं. पण तरीही मी हिंमत हरलो नाही.यादरम्यान डिप्रेशनमध्ये येऊन त्याने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण काही मित्र असेही होते ज्यांनी त्याला मोठा पाठिंबा दर्शवला. आज हीच मंडळी जेव्हा आशिषच्या नृत्याचे कौतुक करतात तेव्हा आपण काहीतरी करू शकलो यासाठी तो त्यांचे आभार मानतो. पण त्यांनी कुठल्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले तर आशिष त्यांचे आमंत्रण मुळीच स्वीकारत नाही. या लोकांनी मला खूप नाव ठेवली होती पण त्यांच्या नावे ठेवण्याने मी इथपर्यंत पोहोचू शकलो म्हणून तो त्यांचे निश्चितच आभार मानतो.