अतुल कुलकर्णीने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने नटरंग या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आमिर खानच्या रंग दे बसंती या चित्रपटात देखील त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या वेबसिरिजमध्ये अतुलने एका राजकारण्याची भूमिका साकारली होती. अभिनयासोबत अतुल नुकताच एका वेगळ्या क्षेत्राकडे वळला आहे. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या आगामी चित्रपटाचे लेखन अतुलने केले आहे.
अतुल केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे तो त्याच्या कामात प्रचंड व्यग्र असतो. पण तरीही वेळात वेळ काढून तो नेहमीच आपल्या आवडत्या ठिकाणी जातो. त्याचे हे आवडते ठिकाण कोणते हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला आहे. कोणताही अभिनेता म्हटला की, त्याच्याकडे प्रचंड पैसा असतो. त्यामुळे परदेशात फिरायला त्यांना अधिक आवडते. पण या अभिनेत्याला परदेशातील नव्हे तर महाराष्ट्रामधील खेडेगावातील एक ठिकाण प्रचंड आवडतं. हे ठिकाण म्हणजे त्याचे फार्म हाऊस आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे गावात अतुल कुलकर्णीचे हे फार्म हाऊस असून तो आणि त्याची पत्नी गीतांजली कुलकर्णी यांचं हे स्वप्नातले घर आहे. या घराचे नाव त्यांनी 'तानसा' असे ठेवले असून या घराचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
आर्किटेक्ट मेघना कुलकर्णी यांनी तानसा या फार्म हाऊसचे डिझाईन केले असून साडेतीन हजार चौरसफूट क्षेत्रफळ असणाऱ्या या घरात एक बेडरुम, एक लिव्हिंग रुम, किचन आणि डायनिंग एरिया आहे. या फार्म हाऊसचे छप्पर फॅब्रिकेटेड स्टील स्ट्रक्चरचे असून आतमध्ये मंगलोर टाइल्सचा वापर करण्यात आला आहे. घरात उत्तम व्हेंटिलेशनची सोय देखील करण्यात आली आहे.
अतुल आणि गितांजली 'तानसा' या घरात जास्तीत जास्त वेळ घालवतात यामागे एक खास कारण आहे. त्यांनी या फार्म हाऊसवर 'तारपा' नावाची संस्था काही वर्षांपूर्वी सुरू केली असून यामार्फत ते अभिनयाची कार्यशाळा घेतात. तसेच 'क्वेस्ट' नावाच्या संस्थेद्वारे ते समाजोपयोगी कार्य करतात. या संस्थेच्या माध्यमातून गरीब मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते.