आपल्या विचित्र विधानांनी नेहमी चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडेंनी (Sambhaji Bhide) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं आहे. पण, करमचंद गांधी हे त्यांचे वडील नसून मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा दावा संभाजी भिडेंनी अमरावतीत केला. या विधानावर राजकारणी, कलाकार अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी भिंडेंना आपापल्या भाषेत उत्तर दिलंय. अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) लिहिलेली ३० जानेवारीची गांधींवरील एक कविताच शेअर केली आहे.
काय आहे ही कविता?
तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं! गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात. पिढ्यानपिढ्या मेल्या तुला मारुन मारुन, तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू....असं नसतं करायचं, मारलं की मरायचं !
एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस, अरे बदनाम करुनही बधत नाहीस? असं त्यांना पुरुन उरायचं नसतं. मारलं की निमुट मरायचं असतं !!
तू ना... एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं, मारलं की निमूट मरायचं असतं...तू..जाऊदे ठिके, पुढच्या वर्षी नक्की मर, ओके !!!
अतुल कुलकर्णीने लिहिलेली ही कविता त्याने स्वत:च्याच आवाजात रेकॉर्डही केली आहे. महात्मा गांधींवर सतत होणाऱ्या टीकेवर त्याने हे प्रत्युत्तर दिलंय. संभाजी भिंडेंनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर अतुल कुलकर्णीने या कवितेतून अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतून त्याने ही कविता सादर केली आहे.