मराठी तसंच हिंदीतही उत्तमोत्तम भूमिका साकारणारे अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni). ते नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडतात. मराठीतील 'नटरंग' मधील त्यांची भूमिका ही कायमच लक्षात राहणारी आहे. अतुल कुलकर्णींनी दहा वर्षांपूर्वी 'राजवाडे अँड सन्स' सिनेमा केला होता. यानंतर ते मराठी सिनेमात दिसलेच नाहीत. नुकतंच त्यांनी याचं कारण सांगितलं आहे.
अमोल परचुरेंच्या 'कॅचअप' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अतुल कुलकर्णी म्हणाले, "मी जाणूनबुजून केलं नाही. तशी स्क्रीप्ट आली नाही. संधी मिळाली नाही. एक संधी आली होती जी माझ्या हातातून गेली. मानवत मर्डरसाठी मला आदिनाथ आणि आशिष बेंडेनी फोन केला होता. आमच्या तिघांचा कॉनकॉल झाला आणि मला ती भूमिका खूपच आवडली होती. मी या भूमिकेसाठी खूप आतुर झालो होतो. तेव्हाच मी एक सिनेमा करणार होतो पण मी म्हटलं की मी त्या तारखा पुढे ढकलतो.
कसं होतं ना नटांचं की तुम्हाला आवडणारं कोणी काही सांगितलं ना की मेंदूत त्यासाठी ती जागा रिझर्व्ह होते. माझंही तेच झालं. मानवत साठी मॅनेजरचं मेकर्सशी बोलणं चालू होतं. काही दिवसांनंतर एकदा मी माझ्या मेकअप आर्टिस्टला सांगत होतो की त्यांचा अजून फोन आला नाही पण आपण मानवत साठी असा लूक करुया वगरे. तर तो म्हणाला 'सर, ती भूमिका आता आशुतोष गोवारीकर करत आहेत'. मला आश्चर्य वाटलं. मॅनेजरला मी हे सांगितलं. तिने मेकर्सला विचारलं तर ते म्हणाले, 'हो आशुतोष गोवारीकर भूमिका करत आहेत.' मला खूप वाईट वाटलं. मी तेवढा बरा नट नसेल हे मी अगदीच मान्य करतो. असं असूही शकतं. पण मला मुख्य या गोष्टीचं वाईट वाटलं की हे मला आदिनाथ आणि आशिष बेंडेकडून कळलं नाही. तर मला कुठूनतरी बाहेरुन मी विचारल्यावर कळालं. हा मुद्दा भूमिका हातातून गेल्याचा नाही पण जेव्हा तुम्ही एवढं त्या गोष्टीत गुंतता आणि असं कुठूनतरी कळतं. मी हा राग आशुतोषवरच काढला. आमिरकडेच आम्ही भेटलो होतो. मी त्याला म्हटलं आता आम्ही दिग्दर्शकाबरोबर स्पर्धा करायची का? तर तो म्हणाला, 'लेखकाने नाही का लाल सिंह लिहिताना तुझ्याबरोबर स्पर्धा केली.'
"मराठी माझी मातृभाषा आहे. अर्थाच मला यामध्ये केव्हाही काम करायचंच आहे. मी तसंही फार फरक करत नाही. जे स्क्रीप्ट येतं ते जास्त महत्वाचं वाटतं. गोष्ट बघणं हे माझ्यासाठी शेवटी जवळचं आहे. पण खरंच जर मराठीत माझ्यासाठी काही काम असेल तर सांगा प्लीज. मी ७ भाषांमध्ये काम करतोय. त्यामुळे प्रत्येक भाषेतले मला विचारतात की तीन वर्ष झाली आमच्याकडे सिनेमा आला नाही."