वूट या वायकॉम १८च्या डिजिटल व्यासपीठाने विविध प्रकारातील आपल्या रंजक आणि अप्रतिम कंटेटने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे आणि अनेक ठरलेले साचेही मोडित काढले आहेत. ऑनलाइन क्षेत्रातील नेतृत्व असलेले वूट आता घेऊन येत आहे आपली नवी वेबसीरिज 'द सवाईकर केस'.
मराठी इंडस्ट्रीतील ख्यातनाम अभिनेते अतुल कुलकर्णी 'द सवाईकर केस'मधून वूट या भारतातील एका आघाडीच्या ओटीटी व्यासपीठावर पदार्पण करत आहेत. अप्रतिम परफॉर्मन्स आणि कलाकारीसाठी ओळखले जाणारे कुलकर्णी यांनी अनेक भाषांमध्ये आजवर काम केले आहे. आता ते तुमच्या टॅबलॉईड्सवर आपली छाप पाडण्यास सज्ज आहेत.हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील काही दिग्गज कलाकारांचा यात समावेश आहे. मराठी इंडस्ट्रीतील ख्यातनाम आणि आघाडीचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या फॅमिली थ्रिलरचे दिग्दर्शन करणार आहेत. वूटची निर्मिती असलेल्या 'द सवाईकर केस'ची कथा गोव्यात घडते. या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या सीरिजचे काम सुरू होईल.
याबद्दल अतुल कुलकर्णी म्हणाला, "वूटच्या आगामी 'द सवाईकर केस'मध्ये काम करणे हा फारच छान अनुभव आहे. हे कथानक अत्यंत रंजक आहे आणि अनेक उत्तमोत्तम कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. मला नेहमीच चौकटीबाहेरच्या व अनोख्या भूमिका करायच्या होत्या आणि 'द सवाईकर केस'मधील माझ्या व्यक्तिरेखेला स्वत:चे असे एक तेज आहे जे मी पडद्यावर जिवंत करणार आहे. हे डिजिटल व्यासपीठ भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. यात अतिशय रंजक पद्धतीने कथा मांडल्या जातात. शिवाय, एक कलाकार म्हणून आमच्या भूमिकांसोबत आम्हाला प्रयोग करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अशा प्रगतीशील व्यासपीठाचा भाग बनणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे."