Join us

कॅन्सरवर मात केल्यानंतर अतुल परचुरेंचं दमदार कमबॅक; थेट अमेरिकेत करणार नाटकाचे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 9:38 AM

Atul parchure: अमेरिका दौऱ्यापूर्वी या नाटकाचे मुंबईमध्ये चार प्रयोग होणार आहेत

मराठी सिनेविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अतुल परचुरे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड जोखमीचा आणि कठीण होता. परंतु, या रोगावर मात करत आता अतुल परचुरे पुन्हा एकदा नव्या दमाने प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. नुकतीच त्यांनी नाटकासाठी अमेरिका दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.

अतुल परचुरे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत लवकरच ते 'खरं खरं सांग' या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौरा करणार आहेत. हे नाटक फ्रेंच नाटककार फ्लॉरियन झेलर यांच्या 'द ट्रूथ' या नाटकावर आधारित आहे.  विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकाचं लेखन नीरज शिरवईकर यांनी केलं असून हे नाटक पहिल्या दिवसापासून रंगमंच गाजवत आहे.

'खरं खरं सांग' या नाटकाच्या निमित्तानं अतुल परचुरे आणि अभिनेत्री गोडबोले  ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर पुनरागमन करणार आहेत. या नाटकात सुलेखा तळवलकर आणि  राहुल मेहेंदळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र, काही कारणास्तव हे कलाकार अमेरिका दौरा करु शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या इरा आणि रजत या भूमिका अतुल परचुरे आणि मुग्धा गोडबोले हे साकारणार आहेत. विशेष हा अमेरिका दौरा करण्यापूर्वी या नाटकाचे मुंबईत ४ प्रयोग होणार आहेत.

"नाटक USA ला जायच्या आधीचे ४ प्रयोग वेगळ्या संचात. पुढील प्रयोग: 7 ऑक्टोबर शनिवार 4 वा विष्णुदास भावे, वाशी, 8 ऑक्टोबर रविवार 4 वा दीनानाथ, विलेपार्ले, 14 ऑक्टोबर शनिवार 4 वा यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, 15 ऑक्टोबर रविवार 4 वा काशिनाथ घाणेकर, ठाणे," असं कॅप्शन देत अतुल परचुरे यांनी त्यांच्या मुंबईत होणाऱ्या प्रयोगांची माहिती दिली आहे.

दरम्यान, 'खरं खरं सांग' या नाटकात राहुल मेहेंदळे, सुलेखा तळवलकर, ऋजुता देशमुख आणि आनंद इंगळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने अतुल परचुरे पुन्हा रंगमंचावर येत आहेत. तर, मुग्धा गोडबोलेदेखील हॅम्लेट या नाटकानंतर पुन्हा एकदा रंगमंच गाजवायला सज्ज झाली आहे.

टॅग्स :अतुल परचुरेनाटकसिनेमामराठी अभिनेता