Join us

"१५ दिवसांपूर्वीच तर...", अतुल परचुरेंच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' फेम अभिनेता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:09 AM

अतुल परचुरे यांच्या निधनानंतर कलाकारांना धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Atul Parchure Passed Away: मराठी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  आता त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

अतुल परचुरे यांच्या निधनानंतर कलाकारांना धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 'ठरलं तर मग' फेम अभिनेते सागर तळशीकर यांनी अतुल परचुरेंच्या निधनानंतर एक आठवण शेअर केली आहे. एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. 

अतुल परचुरे...

एक खूप चांगला जिंदादील मित्र गेला. १५ दिवसांपूर्वीच खूप गप्पा झाल्या होत्या. एकत्र कामही खूप केलं. 

१९९४ ला आमचा मित्र चंद्रकांत कुलकर्णीने दिग्दर्शित केलेल्या, “व्यक्ती आणि वल्ली”च्या चौकोनी कुटुंबामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. विशाल इनामदारच्या इट्स ब्रेकिंग न्यूजमध्ये तर कित्येक दिवस रूम पार्टनर होतो. मग खूप भेटी, खूप गप्पा...दादरला शो नाही म्हणून ठाण्याला जाऊन आमचा सुधीर फडके सिनेमा पाहून जाताना आवर्जून फोन केला होता...

अलावीदा मित्रा…

अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं.  त्यांनी पु.ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा  'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  

टॅग्स :अतुल परचुरेमराठी अभिनेताटिव्ही कलाकारकर्करोग