Join us

"आईच्या आजारपणात मोठ्या भावासारखे..."; अभिषेक घोसाळकरांच्या आठवणीत अवधूत गुप्ते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 2:22 PM

अवधूतने अभिषेक घोसाळकर यांच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत.

दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर काल सोशल मीडिया लाईव्ह सुरु असतानाच गोळीबार झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना वाढतच आहेत. नक्की चाललंय काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. भरदिवसा गोळीबार सुरु असून त्याचं फुटेजही समाजमाध्यमात पसरत आहे. यामुळे साहजिकच दहशत निर्माण झाली आहे. मराठी संगीत दिग्दर्शक, गायक अवधुत गुप्ते (Avadhoot Gupte) फेसबुक पोस्ट करत अभिषेक घोसाळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कोरोनाच्या काळात 'सूर नवा ध्यास नवा' च्या शूटवेळी, तसंच आईच्या आजारपणात अभिषेक घोसाळकर यांनी केलेल्या मदतीचा त्याने उल्लेख केला आहे.

अवधूत गुप्तेने अभिषेक घोसाळकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले, "दहिसरचे माजी नगरसेवक आणि लाडके नेतृत्व अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा प्रत्येक दहिसर-बोरिवलीकर नागरिकांसाठी जितका धक्कादायक आणि दुःखद आहे तितकाच तो माझ्यासाठी देखील आहे! अत्यंत मृदू स्वभावाचे अभिषेक हे कायमच एक मनमिळावू आणि हसरे व्यक्तिमत्व होते. ते कायम लोकांच्या अडीअडचणींना मदतीसाठी धावून जात असत."

तो पुढे लिहितो, "कोरोना काळामध्ये आमच्या ‘सूर नवा ध्यास नवा‘ कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान दररोज सेटवर दोन-चार लोक कोव्हिड पॉझिटिव्ह येत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यापासून ते ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्यापर्यंत अभिषेक प्रचंड मदत करत. माझ्या आईच्या आजारपणात तर त्यांनी मोठ्या भावासारखी मदत केली! अर्थात, त्यांना हा संस्कारांचा वारसा मिळाला तो त्यांच्या वडिलांकडून, म्हणजेच आमचे ज्येष्ठ स्नेही विनोदजी घोसाळकर यांच्याकडून. विनोदजींच्या दुःखाची मी कल्पनाच करू शकत नाही. दुःखाचा हा डोंगर पार करण्यासाठी आणि आपल्या सोबतच आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी लागणारी संपूर्ण शक्ती आई एकविरा त्यांना देवो! अभिषेकजींच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे, तर आम्हा समस्त दहिसर-बोरिवलीकरांचे फार मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर अभिषेकजींच्या आत्म्यास शांती देवो! ॐ शांती!! 

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसंच लाईव्ह सुरु असतानाच हा गोळीबार झाल्याने आता कोणताही धाकच राहिला नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. 

नेमकी घटना काय?

अभिषेक घोसाळकर काल संध्याकाळी आपल्या दहीसर येथील कार्यालयातून फेसबुक लाईव्ह करत होते. यावेळी त्यांच्यासोबत मॉरिस भाई हा देखील होता. दोघंही यापूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू होते. मात्र फेसबुक लाईव्ह करत त्यांनी वैर संपवत आम्ही पुन्हा मैत्री करत आहोत अशी माहिती दिली. तसंच ते महिलांना साड्यांचे वाटपही करणार होते. लाईव्ह संपवून अभिषेक घोसाळकर उठले तेवढ्यात मॉरिसने त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. तसंच स्वत:लाही गोळी मारत आत्महत्या केली. 

टॅग्स :अवधुत गुप्ते अभिषेक घोसाळकरमहाराष्ट्रसोशल मीडिया