मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अवधूत गुप्ते हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. अशातच अवधूत गुप्तेनं जातीय राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं.
नुकतंच अवधूत गुप्तेनं 'मित्र म्हणे' या यूट्यूब चैनलला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, 'एखादा नेता किंवा मंत्री हा पैसे खातो, हे लोकांनी मान्य केलं आहे. आता हे तर व्यवस्थेचा भाग झालं आहे. आता होत असलेल्या जातीय राजकारणाला नेते नाही, तर आपण सामान्य नागरिक जबाबदार आहोत. प्रत्येकाला लायकीचं सरकार मिळतं, असं म्हटलं जातं ते खरं आहे.
पुढे तो म्हणाला, 'जातीय राजकारण करता असं म्हणत लोक राजकारण्यांना शिव्या देतात. पण, यात ते फक्त ५ टक्के दोषी आहेत, ९५ टक्के दोषी तर आपण आहोत. त्यांना व्होटबँक हा शब्द कोणी दिला. ते अमुक जातीची व्होटबँक, तमुक जातीची व्होटबँक असं म्हणतात. ७५ वर्षं झाली तरी आजही व्होटबँक अस्तित्वात आहेत, ही सामान्य माणसाची चूक आहे'.
अवधूतचा हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अवधूतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, १६ भागांमध्येच हे पर्व संपवण्यात आले होते. यानंतर अवधूत कलर्स वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसला. अवधूत गुप्तेची अनेक गाणी सुपरहिटही झाली आहेत. सिनेमा आणि अल्बमसाठी गाणी लिहिण्याबरोबरच अवधूत गुप्तेने राजकीय पक्षांचे टायटल साँगही लिहिले आहेत. अवधूतच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत.