Join us

अवधूत गुप्तेला खुपतेय 'माकडचेष्टा'! घरात माकडांचा हैदोस, केळी पळवली अन्...Video व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 11:16 AM

घरात घुसणाऱ्या माकडांमुळे अवधूत आणि त्याची आईही वैतागली

मराठी संगीत दिग्दर्शक, गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. राज ठाकरे ते देवेंद्र फडणवीस पर्यंत अनेक राजकारण्यांनी, नेत्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली आहे. सेलिब्रिटींना नक्की काय खुपतंय हे विचारत असतानाच अवधूतला गुप्तेला मात्र 'माकडचेष्टा' खुपते असं तो म्हणतोय. याला कारण आहे अवधूतच्या घरी असणारा माकडांचा हैदोस. अगदी घरात घुसून केळी पळवून नेणाऱ्या माकडांचा व्हिडिओ अवधूतने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच अवधूत गुप्ते त्याच्या कुटुंबासह राहतो. आज सकाळीच त्याने घरातील एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये चक्क एक माकड त्याच्या घरात घुसलं आहे. हे माकड टेबलवर चढून लपवून ठेवलेली केळी पळवताना दिसतंय . इतकंच नाही तर नाकावर टिच्चून घरात बसूनच केळी फस्त करत आहे. बरं अवधूतची आई त्याला हाकलायला गेली तर तिच्यावरच धावून जातोय. असा हा मजेशीर व्हिडिओ अवधूतने पोस्ट केला असून लांबलचक कॅप्शन आले आहे. 

 'अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते?तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते!!

व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा!

हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे.

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! .. आणि ह्याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!”

ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात.

माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या-दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. करोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!

बाकी स्ट्रगल चालूच राहील.. फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस!

अवधूत गुप्तेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आमच्याही घरात हाच प्रकार सुरु आहे अशा कमेंट्स अनेकांनी केल्यात. तर माकड तुमच्या नाही तर तुम्हीच त्यांच्या घरात राहायला गेलात असं म्हणत काही पर्यावरणप्रेमींनी टीका केली आहे. 

टॅग्स :अवधुत गुप्ते माकडसोशल मीडिया