Avdhoot Gupte : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांने नुकतेच राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. राजकारणात यायचं आहे असं त्याने थेट म्हणलं आहे. पण तो नेमका कधी राजकारणात प्रवेश करेल याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.
कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी बीकेसी येथे भव्य व्यासपीठावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवधूत गुप्तेही उपस्थित होता. अवधूतने मंचावर गाणंही सादर केले. अवधूत अलीकडे बऱ्याच राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत असल्याने तो राजकारणात लवकरच प्रवेश करेल अशी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्र टाई्म्सला दिलेल्या मुलाखतीत अवधूतने आता स्वत:च स्पष्ट केले आहे.
मुंबई टाईम्स कार्निव्हलमध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्रीने अवधूत गुप्तेशी संवाद साधला. यावेळी अवधूत म्हणाला, 'कोणतीही निवडणूक आली की मला विचारणा होतेच. म्हणून आता मी राजकारणात प्रवेश करत असल्याचंच जाहीर करतो. राजकारणात कशासाठी यायचं आणि कोण उत्तम राजकारण करु शकतो? तर ज्याला स्वत:चे पोट भरायची देखील भ्रांत नाही, तो चांगलं राजकारण करु शकतो. कर्तव्यांची इतिपुर्तता होईल, कुटुंब, संसार या जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतील, मिळवायला आणि गमवायला काहीच नसेल अशा वेळी मी राजकारणात येईन. '
तो पुढे म्हणाला, '२०२९ च्या आमदारकी निवडणुकांपासून मी सगळं पाहतोय. त्यावेळी लोक मी राजकारणात येण्यावर काही शंका घेणार नाहीत. मला खात्री आहे मी समाजकार्यासाठी राजकारणात येईन. मी प्रामाणिकपणे पाच वर्ष देईन. आपण घर साफ करतो, तशीच प्रत्येकाने आपली छोटी चौकट, काही काळापुरती प्रामाणिकपणे साफ केली तर भारत देश बदलायला वेळ लागणार नाही. मी ज्या दिवशी येईन तेव्हा जाण्याचीही तारीख सांगेन.'
अवधूतने राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा झेंडा हा चित्रपट काढला होता. आताची राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा झेंडा सारखा चित्रपटकाढावासा वाटतो का पुष्करने विचारले असता, अवधूत म्हणाला,'मी तेव्हा कार्यकर्त्यांची बाजू मांडली. आता नेत्यांची आगतिकता दाखवेन. माझं दिग्दर्शक म्हणून अर्ध काम झालंय. सध्याच्या माहाराष्ट्राच्या राजकारणात नेते किती आगतिक आहेत हे दिसतंय. त्यामुळे पुढचा चित्रपट तसा असेल. दुसरी बाजू मांडायची इच्छा आहे. मी तो चित्रपट लिहितोय.'
दरम्यान, या सर्व संभाषणात अवधूतने कोणत्या पक्षात येणार यावर काहीच भाष्य केलेसे नाही. मात्र तो लवकरच राजकारणात प्रवेश करेल असे चिन्ह दिसत आहेत.