मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (amruta subhash). कलेवर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा असणाऱ्या अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. त्यामुळे दिग्गज कलाकारांच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. गेल्या कित्येक काळापासून ही अभिनेत्री कलाविश्वात अमृता सुभाष या नावाने वावरते. मात्र, तिचं खरं आडनाव आजही फारसं कोणाला माहित नाही. अमृता आज तिच्या आडनावाऐवजी वडिलांचं नाव लावते. अमृता सुभाष याच नावाने ती आज प्रसिद्ध आहे. मात्र, तिचं आडनाव फार मोजक्या लोकांना माहित असून एका मुलाखतीमध्ये तिने आडनाव न लावण्याच मागचं कारण सांगितलं. सोबत खंतही व्यक्त केली.
काय आहे अमृताचं आडनाव?
अमृताने संदेश कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं असून त्या दोघाचं लव्ह मॅरेज आहे. विशेष म्हणजे संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे अमृताच्या सासरचं आडनाव कुलकर्णी आहे. पण, तिच्या माहेरचं आडनाव आजही कोणाला ठावूक नाही. अमृताच्या माहेरचं आडनाव ढेंबरे असं आहे. परंतु, हे आडनाव ती लावत नाही. ढेंबरे या आडनावाऐवजी ती कायम वडिलांचं नाव लावण्यास पसंती देते.
आडनाव न लावण्यामागे आहे हे कारण
"मला माझं आडनाव लावता येत नाही हे माझं हळवं दुखणं आहे. माझं आडनाव ढेंबरे आहे. पण, माझं हे आडनाव कोणीही आजपर्यंत नीट उच्चारलेलं नाही. कोणी ढगे म्हणते, कोणी ढमढेरे तर कोणी ढोले त्यामुळे आडनाव लावणं सोडून दिलं", असं अमृताने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
दरम्यान, आज अमृता ओटीटी क्वीन या नावानेही ओळखली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून अमृता कलाविश्वात सक्रीय आहे. तिने अवघाचि संसार, झोका, पाऊल खूण या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, श्वास, सावली, हापूस, विहीर यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.