अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर संजू आता मराठी इंडस्ट्रीकडे वळला आहे. संजू बाबा या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
बाबा या चित्रपटाच्या टीझरमध्ये वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. आपल्या मुकबधीर मुलाला सामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता यावा यासाठी त्याचे वडील सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याला शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी, लहान लहान गोष्टींमधील आनंद मिळवून देण्यासाठी ते झटत असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत आपल्याला दीपक डोबरियाल दिसणार असून त्याने याआधी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ओमकारा, तनू वेड्स मनू, दबंग 2, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, हिंदी मीडियम यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकला आहे. तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातील त्याचे संवाद चांगलेच गाजले होते. या चित्रपटातील त्याच्या कॉमिक टायमिंगची देखील चर्चा झाली होती.
संजय दत्तने काही दिवसांपूर्वी ट्वीट करून तो मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले होते. त्याने ट्वीट म्हटले होते की, माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव बाबा असून हा चित्रपट मी माझ्या वडिलांना समर्पित करत आहे. ते संपूर्ण आयुष्यभर माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले.
बाबा या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त प्रोडक्शच्या अंतर्गत केली गेली असून या चित्रपटाची निर्माती संजयची पत्नी मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले असून ट्विटरद्वारे संजयने या चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच केले होते. या चित्रपटाच्या पोस्टवरवर एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून आला होता. भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संजय दत्तच्या आधी अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा या बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.