Join us

'बबन' ने गाठला ८.५ कोटीचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 10:20 AM

द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर ...

द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. ग्रामीण भागाचा संघर्ष आणि रोमांचित प्रेमकहाणी सांगणाऱ्या या सिनेमाची ग्रामीण भागात विशेष दखल घेतली जात आहे. २३ मार्चपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने दहा दिवसांमध्ये ८.५ कोटीची बक्कळ कमाई केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' च्या घवघवीत यशानंतर 'बबन' ला मिळत असलेल्या या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची देखील सर्वत्र चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बबन या सिनेमातील अभिनेता भाऊसाहेब शिंदेने वठवलेली 'बबन' ची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत असून नवोदित अभिनेत्री गायत्री जाधव हिनेदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ग्रामीण भागात या सिनेमाचा बोलबाला अधिक होत असून मुंबईबाहेरील सिनेमागृहात 'बबन' हाऊसफुल ठरत आहे. 'बबन' सिनेमाच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शोजदेखील वाढवण्यातदेखील आले असल्याचे समजते. विशेष म्हणजे दर्जेदार कथानक आणि मांडणीसोबतच 'बबन' सिनेमातील गाणीसुद्धा हिट ठरली आहेत. त्यापैकी 'मोहराच्या दारावर' या गाण्यावर प्रेक्षक सिनेमागृहात ठेका धरतानादेखील काही ठिकाणी दिसून येतात. यासोबतच सिनेमातील इतर गाण्यांनीदेखील सिनेप्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असल्यामुळे अवघा महाराष्ट्र 'बबन' मय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील नायकाचा संघर्ष आणि त्याची महत्वाकांक्षीवृत्ती प्रेक्षकांना भावली असल्यामुळे सिनेमातील हा 'बबन' सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा 'ख्वाडा'च्या घवघवीत यशानंतर भाऊरावांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमादेखील त्याच उंचीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल्पावधीतच लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या 'बबन'ला मोठी मागणी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शोज २०० हून २४० करण्यात आले आहेत. त्यामुळे खास प्रेक्षकांसाठी  महाराष्ट्राच्या सिनेमागृहात 'बबन'चे ४०० हून ५०० शोज वाढवले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.Also Read : ​ख्वाडा फेम भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतायेत, ख्वाडानंतर मी झालो होतो ब्लँक