Join us

‘बबन’ मध्ये उमटणार तरुणाईच्या भावविश्वाचे प्रतिबिंब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 4:20 AM

पारंपरिक व्यवसायाला स्वबळावर मोठं स्वरूप देण्याची धडपड करणारा स्वप्नाळू बबन... स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना परिस्थिती त्याची वाट चुकवते आणि सुरुवात ...

पारंपरिक व्यवसायाला स्वबळावर मोठं स्वरूप देण्याची धडपड करणारा स्वप्नाळू बबन... स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना परिस्थिती त्याची वाट चुकवते आणि सुरुवात होते एका वादळाचा..... ‘बबन' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. ‘ख्वाडा’ या पहिल्याच सिनेमाद्वारे पदार्पण करून राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर लागलेल्या दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्याकडून रसिकांच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत. त्यामुळे कलात्मकतेला कोणत्याही प्रकारे छेद न देता व्यावसायिक स्वरूपात हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्धार असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील तरूणाची स्वप्ने आज बदललेली आहेत. ‘बबन’ हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये बबनची व्यक्तिरेखा वेगळी आहे. ग्रामीण भागातील प्रेमकहाणी दाखवणारा हा चित्रपट... चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने लोकमतला दिलेल्या भेटीत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे म्हणाले , सध्या मराठी चित्रपटसृष्टी खूप पुढे जात आहे. प्रत्येकजण  आपली गोष्ट पडद्यावर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नव काही करु इच्छिणाऱ्या तरुणांना हा चित्रपट मार्गदर्शक नक्कीच ठरेल. भाऊ शिंदे म्हणाले, माझा स्वभाव पहिल्यापासून लाजाळू होताच. त्यामुळे ‘बबन’ ही व्यक्तिरेखा साकारणे मला तसे सोपे गेले होते. तसेच ‘ख्वाडा’ च्या तुलनेत ‘बबन’ ची भूमिका खूप वेगळी आहे. ही भूमिका रोमँटिक आहे. रोमँटिक भूमिका करणं माझ्यासाठी खूप चँलेजिंग होते. गायत्री जाधव म्हणाली, मी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. हा माझा पहिलाच चित्रपट असून अभिनयाचा अनुभव मला कधीच नव्हता यासाठी मी खुप मेहनत केली. काम करताना खुप शिकायला मिळाले. सर्व टीमने मदत केली. चित्रपटाचे संगीत हर्षित अभिराज, ओंकारस्वरूप यांचे आहे.विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप  फंड आणि भाऊसाहेब शिंदे या चौकडीने सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ सिनेमा येत्या २३ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, मृणाल कुलकर्णी, प्रांजली कांझनकर, चंद्रकांत राऊत यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.