‘बाबू बँड बाजा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी (Rajesh Pinjani ) यांचं काल अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. पिंजाणी मुळचे नागपूरचे. मात्र सध्या ते पुण्यात मुक्कामाला होते. आज त्यांच्यावर नागपूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
राजेश पिंजाणी यांनी ‘बाबू बँड बाजा’ हा एकच चित्रपट दिग्दर्शित केला. पण तो चित्रपट महोत्सवांमध्ये प्रचंड गाजला. सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडणा-या या चित्रपटासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपटानं गौरविण्यात आलं होतं.
आजही खेडोपाडी असलेले बॅन्डवाले अतिशय हलाखीचं जीवन जगतात. त्यांचा रोजचा जगण्या-मरण्याचा संघर्ष ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात बॅन्डवाल्याची प्रमुख भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली होती तर त्यांच्यासोबत मिताली जगताप-वराडकर, विवेक चाबूकस्वार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील असोसिएट डायरेक्टर, निर्माते अमोल परचुरे यांनी राजेश पिंजाणी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत फेसबुकवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘तो नेहमी हसतमुख असायचा. इतरांवर शेरेबाजी करणं त्याचा स्वभावात नव्हतं, मराठी चित्रपटसृष्टीत असूनही! सोबत असताना तो मित्रापेक्षा मोठ्या भावासारखा वाटायचा. त्याचं जागतिक सिनेमाचं ज्ञान बेफाट होतं. तो उगाच चारचौघांसमोर ते ज्ञान पाजळत बसायचा नाही. राजेश तू गेल्यावर तुझा चित्रपट बघताना मी थोडा इमोशनल होईन, मग तू म्हणणार, किती फिल्मी आहेस रे,’अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
अॅड. महेश भोसले यांनी पिंजाणी यांच्या निधनानंतर पोस्ट करत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘फँड्री आला त्याच वेळी अजून एक तसाच दाहक सिनेमा आला होता, बाबू बँड बाजा. त्या सिनेमाला देखील राष्ट्रीय पुरस्कार होता. राजेशजी त्या सिनेमाचे दिग्दर्शक. एक माणूस म्हणून प्रचंड चांगली व्यक्ती. प्रचंड तल्लख आणि विनोद बुद्धी होती या माणसाकडे,असं भोसले यांनी म्हटलं आहे.