Join us

मराठी रूपेरी पडद्यावर अवतरणार ‘बच्चन’,2019 मध्ये होणार प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 2:00 PM

ओम प्रकाश भट, स्वाती खोपकर, सुजय शंकरवार निर्मित ‘बच्चन’ चित्रपटाचे लेखन समित कक्कड आणि ऋषिकेश कोळी यांनी केले आहे.

भारतात कलाकार आणि क्रिकेटर्सवर रसिक जीवापाड प्रेम करतात. बॉलीवुडच्या कलाकारांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी रसिक वाट्टेल ते करायला तयार असतात. कलाकारांची रसिकांमध्ये अशी काही क्रेझ पाहायला मिळते की रसिक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. कुठे कलाकारांची मूर्ती उभारुन तर कुठे मंदिरं उभारण्यात आली आहेत. काही रसिक आपल्या मुलांची नावंसुद्धा आपल्या लाडक्या कलाकारांच्या नावावरुनच ठेवतात.

सर्वसामान्य रसिकांसह बड्या निर्मात्यांनाही कलाकारांच्या नावाची भुरळ पडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कलाकारांच्या नावाचा वापर करुन सिनेमाला शीर्षक देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. यांत आणखी एका अशाच सिनेमाची भर पडणार आहे. 'बच्चन' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा अमिताभ बच्चन यांच्याशी काही संबंध आहे का किंवा मग बिग बी यांचे नाव देऊन रसिकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे का अशा अनेक गोष्टी येणा-या काळात स्पष्ट होतील. 

सध्या 'बच्चन' या टायटलवरून अनेक तर्कवितर्कही लावण्यात येत असले तरीही सिनेमाची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ आणि ‘पर्पल बुल एंटरटेन्मेंट’ निर्मित समित कक्कड या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

 

'लय भारी' सारखा माईल स्टोन सिनेमा दिल्यानंतर ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ने 'येरे येरे पैसा' सारखा धम्माल पैसावसूल चित्रपट दिला. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती करत अमेय विनोद खोपकर यांची ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ संस्था, मनोरंजन क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करताना दिसतेय. यानंतर ते आत्ता काय घेऊन येणार ? याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे.तर 'आयना का बायना' आणि 'हाफ तिकीट' सारखे मनोरंजक आणि आशयघन चित्रपट दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिलेत. त्यांच्या 'हाफ तिकीट' चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुमान मिळवले असून जवळपास २८ नामांकित फिल्म फेस्टिवल्समध्ये ३१ मानाच्या पुरस्कारांनी समित कक्कड यांना गौरविण्यात आले आहे.विषयासोबत सादरीकरणावरही हुकूमत गाजविणारा हा दिग्दर्शक आता ‘बच्चन’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येणार आहे. 

 ओम प्रकाश भट, स्वाती खोपकर, सुजय शंकरवार निर्मित ‘बच्चन’ चित्रपटाचे लेखन समित कक्कड आणि ऋषिकेश कोळी यांनी केले आहे. या दोघांच्या लेखणीतून साकारलेल्या ज्वलंत विषयाची कथा–पटकथा समित-ऋषिकेश यांचीच आहे तर संवाद ऋषिकेश कोळी यांनी लिहिले आहेत. ‘बच्चन’ या शीर्षकावरून चित्रपटाविषयीची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. या ‘बच्चन’ मध्ये नेमकं काय असणार हे गुलदस्त्यात असलं तरी काहीतरी नक्कीच जबरदस्त घेऊन,‘बच्चन’ आपल्यासमोर २०१९ मध्ये अवतरणार आहे.