Join us  

"एका ५ वर्षाच्या मुलीचा बाप म्हणून...", बदलापूर प्रकरणी संदीप पाठकचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:57 AM

बदलापूर येथील महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. मराठी अभिनेता संदीप पाठकने गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र  खळबळ उडाली आहे. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. बदलापूर येथील महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. तर सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत व्यक्त होताना दिसत आहेत. 

आता मराठी अभिनेता संदीप पाठकने गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संदीपने तारांगण या युट्यूब चॅनेलशी बोलताना बदलापूरमध्ये घडलेल्या या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. "गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर येत आहेत. कोलकातानंतर बदलापूरमध्ये घटना घडली. ही मुलगी तर फार छोटी आहे. मी सुद्धा एक ५ वर्षाच्या मुलीचा बाप आहे. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात छोट्या मुलीपासून ते आजीपर्यंत स्त्री सुरक्षित आहे का, असा प्रश्न पडतो. आपल्या न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास आहे. त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, असं मला वाटतं. यासाठी वेगळं फास्ट ट्रॅक कोर्ट असावं. लोकांचा संताप जोपर्यंत आहे...तोपर्यंत फाशी देणं गरजेचं आहे", असं संदीप म्हणाला. 

बदलापूरमधील शाळेतील चार वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 12 आणि 13 ऑगस्टला हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत गुरुवारी राज्य सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढले. "शाळांसारखी जागाच सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अधिकार वगैरे सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. त्यावर बोलून काय उपयोग? अवघ्या चार वर्षांच्या मुलींनाही सोडले जात नाही. ही अत्यंत धक्कादायक स्थिती आहे. पोलिसांनाही त्यांच्या सद रक्षणाय: खलनिग्रहणाय: या ब्रीदवाक्याची आठवण करून द्यायची वेळ आली आहे. हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्यापूर्वी बदलापूर पोलिसांनी काय पावले उचलली याची माहिती आम्हाला प्रतिज्ञापत्राद्वारे द्या", असे निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी २७ ऑगस्टला ठेवली.  

टॅग्स :बदलापूरमराठी अभिनेताटिव्ही कलाकार