Join us

"भीतीने चरा चरा कापला पाहिजे तो...", बदलापूर लैंगिक अत्याचारावर संतोष जुवेकरची खरमरीत पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 3:38 PM

Santosh Juvekar on Badlapur Case : अभिनेता संतोष जुवेकर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून बदलापुरात घडलेल्या निंदनीय घटनेवर संताप व्यक्त केलाय.

Santosh Juvekar on Badlapur Case : बदलापूर येथील प्रतिष्ठीत एका शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कर्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याचाच प्रत्यय मंगळवारी बदलापुरात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. तब्बल १० तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. या घटनेवर वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कलाकार मंडळींनीदेखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) यानेदेखील या घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

संतोष जुवेकर याने इंस्टाग्रामवर काळा ठिपक्याचा फोटो शेअर करत लिहिले की, बदलापूरमध्ये घडलेल्या अमानुष आणि अक्षम्य क्रूर कृत्य करणाऱ्या शैतानांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. भर चौकात अशी शिक्षा द्या की असा विचार कुणा दुसऱ्या नराधमाच्या मनात आला तरी भीतीने चरा चरा कापला पाहिजे तो. ह्याचा निषेध म्हणून मी माझ्या प्रोफाईलवर हा काळा ठिपका ठेवत आहे. सरकारला आणि न्याय व्यवस्थेला ही मागणी करतो की ह्या अत्याचारावर कठोर पाऊल उचलावे.

काय आहे हे प्रकरण?बदलापुरातील एका शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कामगाराने १२ ऑगस्टला लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलींच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरातच १२ तास उभे करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे बदलापुरकरांच्या रागाचा उद्रेक झाला. दरम्यान लैंगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी बुधवारी कल्याण न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तर आता आरोपी अक्षय शिंदेंचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्याचे कळत आहे.

टॅग्स :संतोष जुवेकरबदलापूरगुन्हेगारी