केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. बाईपण भारी देवा हे चित्रपटाचे शीर्षक जरी हटके असलं तरीही चित्रपटाच्या सुरुवातीला हे नाव नव्हते. याबाबतचा खुलासा नुकताच लेखक ओंकार दत्तने सोशल मीडियावर केला आहे.
ओंंकार दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात बाईपण भारी देवामधील शशी म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जेव्हा पहिल्यांदा स्क्रीप्ट देण्यात आली, त्यावेळचा फोटो आहे. या स्क्रीप्टवर बाईपण भारी देवा नाही तर वेगळे शीर्षक दिसत आहे. स्क्रीप्टवर मंगळागौर हे नाव दिसते आहे. याचाच अर्थ बाईपण भारी देवा नाही तर चित्रपटाचे सुरुवातीचे नाव मंगळागौर असणार होते.
ओंकार दत्तने स्क्रीप्टचा फोटो शेअर करत लिहिले की, हे वंदू मावशीचं स्क्रीप्ट होतं. तेव्हा बाईपण भारी देवाचं वर्किंग टायटल मंगळागौर होतं. म्हणून ह्यावर ते नाव आहे. पण वर दिसणाऱ्या गुलाबी पताकांची सगळी कलाकुसर तिची आहे. हे तिचं वर्किंग आहे. ही तिची वर्किंग करण्याची स्टाईल आहे. प्रत्येक सीन का घडतो. कुठे घडतो, याचे तिचे तिचे नोट्स. प्रत्येक नव्या कलाकाराला ह्यातून शिकण्यासारखं नक्कीच काहीतरी आहे. हीच मेहनत, हेच डेडिकेशन आपल्या प्रत्येक कामात आणायला हवे हे बाईपणने शिकवले.
'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई'बाईपण भारी देवा' चित्रपटात सुकन्या मोने, रोहिणी हट्टांगडी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब व वंदना गुप्ते या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. सहा बहिणींची हटके स्टोरी सांगणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत बॉक्स ऑफिसवर २६.१९ कोटींचा बिझनेस केला आहे.