'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन आठवड्याच दमदार कमाई करत तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंच्या या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. केदार शिंदेंचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला असून बॉक्स ऑफिसवर सुसाट आहे. या चित्रपटाने १४ दिवसांत ३७.३५ कोटींची विक्रमी कमाई करत तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केलं आहे. दरम्यान केदार शिंदेंची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पत्नी आणि लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सिनेमा रिलीज झाल्यापासून केदार शिंदे सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
केदार शिंदेंची पोस्ट ''२०१९ पासून #baipanbhaarideva या सिनेमाचा ध्यास घेतला होता. निर्माता मिळत नव्हता, त्यावेळीच्या कित्येक रात्री डोळ्यात पाणी यायचं. मनात असंख्य विचार. या सगळ्याला handle करण्याचं सामर्थ्य मिळालं ते स्वामींमुळे आणि या दोघींमुळे. आपण creative असतो तेव्हा संसार चालतो तो घरच्या गृहिणी मुळेच. बेला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळते. घर आणि सिनेमा याची निर्मिती!! घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही. तो मान सन्मान दिलाच पाहिजे.''
''तीने नेहमी मला धीर देण्याचं काम केलय. बायकांचं मन जाणून घेताना, कित्येक वेळा बायकोचं मन मी विसरून गेलो आहे. आणि माझी सना.. या सिनेमाच्या project report पासून सगळ्याची जबाबदारी तीने सांभाळली. या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडेल ते काम करत होती. हा सिनेमा पुर्ण होऊ शकला तो सना मुळे.''
''६ अभिनेत्रींना मेकअप रूम मधून सेटवर आणायचं महत्त्वपुर्ण काम ती करायची. यांच्या गप्पा थांबवून हे करणं किती अवघड आहे! हे इथे लिहून समजणार नाही. #महाराष्ट्रशाहीर हा नंतर केलेला सिनेमा. पण त्यात सना confidently भुमिका करू शकली ते या ६ अभिनेत्रींचा अभिनय पाहून! हा प्रवास खडतर होता, तरी आनंददायी होता. आज कोट्यावधी रुपये हा सिनेमा कमावतो आहे, त्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. पण कोट्यावधी रुपयांपेक्षा मोलाची माझी टीम, त्यामुळे हे घडलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ''