केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. काहीच दिवसात सिनेमाने ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. सहा बायकांनी मिळून ही कमाल केली आहे. सिनेमात जितकं बायकांचं कौतुक होतंय तितकंच पुरुषांच्या कामाचंही होतंय. ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांना रोहिणी हट्टंगडी यांच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता आठवत असेलच. नवरा असावा तर असा अशीच प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून आली असेल इतकं गुणी ते पात्र दाखवण्यात आलं आहे. पण या अभिनेत्याची निवड कशी झाली तो किस्साही रंजकच आहे बरं का.
'बाईपण भारी देवा'मध्ये रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी जया ही भूमिका साकारली आहे. तर सतीश जोशी (Satish Joshi) यांनी त्यांच्या नवऱ्याची म्हणजेत अरुण देसाई ही भूमिका केली आहे. जया त्यांना कितीही बोलल्या तरी अरुण देसाई यांच्या चेहऱ्यावर हसू पूर्ण सिनेमाभर कायम दिसतं. हेच अत्यंत गोड पात्र प्रेक्षकांनाही भावतं. तर सतीश जोशी यांचं कास्टिंग कसं झालं याबद्दल केदार शिंदे म्हणाले, 'मी आणि अजित भुरे चित्रपटाच्या लोकेशन्सचा शोध घेत होतो तेव्हा आम्ही एका घराबाहेर पोहोचलो. घराचं दार वाजवल्यावर सतीश जोशींनी दार उघडलं आणि त्यांचा तो हसरा चेहरा माझ्या मनातच भरला. यांनाच अरुण देसाईची भूमिका करायला सांगूया असं मी अजितला म्हणालो. तर तो म्हणाला अरे ते अभिनेते नाहीत. त्यांना काही अनुभव नाही. पण मी ठाम होतो. मी सतीश जोशींना या भूमिकेसाठी विचारलं तर ते लगेचच हो म्हणाले.'
सिनेमात सतीश जोशींनी अगदी उत्तम अभिनय करत सर्वांचंच मन जिंकलं आहे. आपल्या बायकोला कायमच समजून घेत आलेला आणि तिचं कोणतंही बोलणं मनाला लावून न घेता तिला हसवणारा असा हा नवरा त्यांनी साकारला. तर दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे यांनीही साधनाच्या सासऱ्याचं पात्र अप्रतिमरित्या निभावलं. त्यामुळेच 'बाईपण भारी देवा' मध्ये पुरुषही चांगलेच भाव खाऊन गेलेत.