Join us  

'बकुळानं दिली पुरस्कारांसोबत स्वतःची ओळख', Sonalee Kulkarniला मराठी सिनेइंडस्ट्रीत १५ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 1:12 PM

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सोनालीने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानं ती रसिकांवर मोहिनी घातली आहे. दरम्यान, सोनालीला मराठी सिनेइंडस्ट्रीत १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने साकारलेली बकुळा प्रेक्षकांना खूपच भावली होती. आता तिने या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने लिहिले की, १५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत “बकुळा” म्हणून प्रवेश केला… आणि तुम्ही तुमच्या मनात घर करू दिलं..तेव्हा पासून आजतागायत दिलेल्या प्रेमाबद्द्ल मी ऋणी आहे आणि कायम राहणार. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाने, या भूमिकेने खूप दिलं - पुरस्कारांपासून ते स्वतःची ओळख, चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभं राहण्याची ताकद पासून ते माय बाप रसिक प्रेक्षकांची साथ! हा १५ वर्षांचा प्रवास पुढची कमीत कमी अजून १५ वर्षं असाच सुरू ठेवण्यासाठी तुमची नेहमी सारखी पाठीवर थाप असू द्या, बास.

सोनालीने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, केदार शिंदे सर तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्यावर घेतलेली मेहनत आणि दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर हा प्रवास मी सुरू करू शकले, याची जाणीव आणि कृतज्ञनता कायम बाळगून ठेवीन. श्री स्वामी समर्थ.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीकेदार शिंदे