Join us

छोट्या चिमुकल्यांसाठी या बालनाट्यांची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 9:00 PM

गेली अनेक वर्ष चित्रपट व नाट्य निर्मिती, व व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणारे अभिनेते संतोष वाजे बालप्रेक्षकांसाठी सामाजिक संदेश तसेच धम्माल मनोरंजन करणारी आठ बालनाटये घेऊन येत आहेत.

दिवाळीची सुट्टी म्हटली की, मुलांसाठी मज्जाच मज्जा असते. पण सुट्टीत मुलांसाठी नेमकं काय करायचं? हा पालकांना मोठा प्रश्न पडतो. त्यात हल्ली मुलांच्या आवडी निवडी बदलू लागल्या आहेत. मनोरंजनाची साधने बदलली आहेत. टीव्ही, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल गेम आणि विविध अॅप्स यामुळे बालमनाच्या मनोरंजनाच्या संकल्पना पूर्ण बदलल्यात. तरी आजही मुलांना बालनाट्य पहावीशी वाटतात. कारण सामाजिक संदेश देणारी जुनी लोकप्रिय नाटकं नव्या रूपात प्रत्यक्षात रंगमंचावर पहाण्याची मज्जा काही वेगळीच असते. 

गेली अनेक वर्ष चित्रपट व नाट्य निर्मिती, व व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणारे अभिनेते संतोष वाजे बालप्रेक्षकांसाठी सामाजिक संदेश तसेच धम्माल मनोरंजन करणारी आठ बालनाटये घेऊन येत आहेत. संतोष वाजे आणि एबीआय आर्टिस्ट क्लब मुंबई प्रस्तुत, ज्योती वाजे निर्मित “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी,” “अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलीबाबा आणि ४० चोर” ही सात बालनाटये रंगभूमीवर येत असून या सातही नाटकांचे लेखन राजेश कोळंबकर यांनी तर दिग्दर्शन राहुल इंगळे आणि सागर जेठवा यांनी केले आहे. 

“चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी” या बालनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत गुरुवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता टिळक स्मारक, पुणे येथे होणार आहे तर “अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलीबाबा आणि ४० चोर” या बालनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत गुरुवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, शनिवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक, पुणे तर शनिवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२. ३० वाजता कालिदास नाट्यगृह, नाशिक येथे होणार आहे.

लहान मुलांना विनोदी, परिकथा, अद्भूत व ऐतिहासिक अशी विविध नाटकं फारच आवडतात. संतोष वाजे यांनी अशीच नाटके बाल प्रेक्षकांसाठी निवडली असून या सर्व नाटकातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी’ किंवा ‘अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलीबाबा आणि ४० चोर’ या सर्व गोष्टी अनेकदा मुलांच्या ऐकण्यात किंवा पाहाण्यात आल्या आहेत. त्यातील गंमत, चातुर्य, विनोद, शौर्य सर्वांना माहीत आहे. पण प्रत्यक्षात रंगमंचावर ही सर्व नाटकं पाहाताना मुलांना वेगळीच मजा येणार आहे. कारण या सर्व नाटकात विविध शाळेतील लहान मुले काम करत असून त्यांचा उत्स्फूर्त अभिनय या नाटकात पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे फूल टू टाइमपास असलेली “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी” ही चार नाटके एकाच तिकीटावर आणि  “अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलीबाबा आणि ४० चोर” ही तीन नाटके एकाच तिकिटावर पहायला मिळणार आहेत.