Join us

"लहान असो वा मोठा वाघ..", 'बाल शिवाजी' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट; आकाश ठोसर दिसणार महाराजांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 1:22 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती निमित्त 'बाल शिवाजी' या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

रवी जाधव यांच्या 'बाल शिवाजी' (Bal Shivaji) या सिनेमाची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासून शिवप्रेमी आणि सिनेप्रेमींमध्ये या सिनेमाची उत्सुकता आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती निमित्त 'बाल शिवाजी' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. या सिनेमात 'सैराट' फेम आकाश ठोसर (Akash Thosar) 'बाल शिवाजी'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'बाल शिवाजी' हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे.

'बाल शिवाजी' चित्रपटात शिवरायांचा वयवर्षं १२ ते १६ पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या रंजक गोष्टी पाहायला मिळतील. या सिनेमाचे पोस्टर आकाश ठोसरने सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, "लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा 'बाल शिवाजी' हा महाचित्रपटाचे पहिले पोस्टर".

दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले,  “माझा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवेल. मी गेली नऊ वर्ष या स्क्रिप्टवर काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट करणार आहे. चित्रपटाची कथा संदीप सिंग यांनी समजून घेतली. मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची आम्ही एकमताने निवड केली. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालो आहे.”

'बाल शिवाजी' चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग, सॅम खान, रवी जाधव, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि अभिषेक व्यास यांनी केली आहे.  लिजेंड स्टुडिओ, एव्हीएस स्टुडिओ आणि रवी जाधव फिल्म्स यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'बाल शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असून चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.  या चित्रपटाचे चित्रीकरण वर्षाअखेरीस सुरू होईल.

टॅग्स :आकाश ठोसररवी जाधवछत्रपती शिवाजी महाराज