बाळासाहेब ठाकरे यांंचं कलाकारांशी असलेलं नातं सर्वांना ठाऊकच आहे. संजय दत्त, दिलीप कुमार पासून मराठीतल्या भरत जाधव, केदार शिंदेंपर्यंत अनेकांचे बाळासाहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना बाळासाहेबांचा एक खास किस्सा शेअर केलाय. त्यावेळी मकरंद अनासपुरे यांचा कोणता सिनेमा बाळासाहेबांना आवडला, याचा खुलासा मकरंद यांनी केला.
मकरंद अनासपुरेंनी लोकमत फिल्मीशी गप्पा मारताना सांगितलं की, "आम्ही बाळासाहेबांना भेटायला गेलो. संजय शिरसाट यांनी वेळ ठरवली होती. आम्हाला वाटलं आमची फक्त पाच-दहा मिनिटंच भेट होईल. पण बाळासाहेबांनी आमच्याशी तास - दीडतास गप्पा मारल्या. मला ते म्हणाले, तुझा प्रत्येक पोलीस स्टेशनला फोटो लागलाय. मी म्हणालो, मी काही नाही केलं. याचा संदर्भ असा की त्यांना माझा गोष्ट छोटी डोंगराएवढी सिनेमा खूप आवडला होता. त्यात मी कृषीमंत्र्यांना थोबाडीत मारली होती. त्यांनी ग्रेट भेट सारख्या मुलाखतीत या सिनेमाचा उल्लेख केला होता."
मकरंद अनासपुरे बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला. याशिवाय ते पुढेही म्हणाले, "मला आठवतंय जर मी बाळासाहेबांच्या १० सभा बघितल्या असतील तर ज्या राजकीय माणसासाठी त्यांनी सभा घेतली तो निवडूनच आलेला आहे." मकरंद अनासपुरे 'राजकारण गेलं मिशीत' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मकरंद यांनीच केलं असून हा सिनेमा १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.