‘बळी’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऊसासे टाकणाऱ्या आवाजातील एका आईचे आर्त उद्गार कानी पडतात. ‘बाSSळा’ अशी आर्त हाक ती कुणालातरी घालते आहे. त्यानंतर या चित्रपटाचा नायक एका पडक्या वाडारुपी रुग्णालयात कुणाचातरी शोध घेताना दिसतो. ‘मी इथेच आहे बाळा,’ असा त्या आईचा काहीसा घाबराघुबरा आवाज ऐकू येतो. त्या पाठोपाठ ‘एलिझाबेथSS’ अशी हाक ऐकू येते. ती आई ‘घाबरू नकोस...’ म्हणत आपल्या बाळाला धीर देवू पाहते.
काही सेकंदांचा हा टीझर अत्यंत घबराट निर्माण करतो. अंगावर शहारा आणतो. ही एलिझाबेथ कोण, त्यातील आईचे आणि तिचे काही नाते आहे का? चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी कुणाचा शोध घेत आहे, असे असंख्य प्रश्न आपल्याला हा टीझर पाहिल्यावर पडल्याशिवाय राहत नाहीत. दरम्यान ‘समांतर आणि लपछपीच्या निर्मात्यांची प्रस्तुती’ असे शब्द पडद्यावर उमटतात. आपल्याला दर्जेदार निर्मितीची हमी मिळते. आपण काहीतरी अभूतपूर्व असे पाहत आहोत, अशी खात्री हा टीझर पाहून होते आणि ‘बळी’बद्दलची उत्कंठा ताणली जाते. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-२’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे.
“बळी’ची याआधी जी दोन पोस्टर आम्ही प्रदर्शित केली त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्याकडून चित्रपट कधी येतोय, अशी विचारणा सुरु झाली आहे. हॉरर चित्रपट म्हटला की विशाल फुरियापेक्षा आणखी चांगला पर्याय काय असू शकतो? त्याशिवाय मराठी चित्रपटक्षेत्रातील एक सर्वोत्तम नट स्वप्निल जोशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. सर्वकाही सर्वोत्तम असे जुळून आले आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना एक वेगळा आणि अभूतपूर्व असा अनुभव मिळवून देईल, हे आम्ही नक्की सांगू शकतो,” असे उद्गार निर्माते आणि ‘जीसिम्स’चे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.
‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आलेले दिग्दर्शक विशाल फुरिया ‘बळी’बद्दल म्हणाले, “लपाछपी’पेक्षाही हा वेगळा चित्रपट आहे आणि त्याची प्रचीती प्रेक्षकांना या टीझरवरून आली असेल. यातील प्रत्येक नटाने आपली भूमिका उत्तमरित्या साकार केली आहे. निर्मितीमूल्यांमध्ये निर्मात्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही.